Jalna News : जालना जिल्ह्यातील (Jalna Distric) शहर आणि ग्रामीण भागात बुध्द पौर्णिमा उत्सव निमित्त मिरवणुका आणि इतर कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच 8 मे रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने राजुर, माळाचा गणपती आणि मावा पाटोदा येथे गणपती मंदिर असल्याने सदर ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सोबतच सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधकांत एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यासाठी 4  मे ते 17 मेपर्यंत आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. 


अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकु आणि इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ बाळगता येणार नाही. तसेच तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तूजवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवता येणार नाही. 


तसेच व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणता येणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करता येणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला देखील करता येणार नाही. सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा पत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगता नाही. तसेच  पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे.    


यांना आदेशात सूट...


हा आदेश कामावरील कोणताही ‍अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.  हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी 4 मे रोजी 6 वाजेपासून ते 17 मे रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू असणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु, प्रत्येक जिल्ह्यासाठी नवीन एम-3 बनावटीच्या ईव्हीएम देण्यात येणार