मुंबई : पाणी फाऊंडेशन तर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा आज करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अमिर खान, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, सत्यजित भटकळ, अमिरच्या पत्नी किरण राव आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.


वॉटरकप स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी या स्पर्धेचं कौतुक करताना वॉटर कप स्पर्धेने गाव एकसंघ झालेलं पाहायला मिळाल्याचं म्हटलं. तर यंदा या स्पर्धेत तब्बल 75 तालुके सहभागी होणार असल्याचं सांगितलं.

यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22 मे 2018 आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये आणि 40 लाख रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. अशा रीतीने स्पर्धेत विजेत्या गावांना मिळणारी पारितोषिकांची एकूण रक्कम जवळपास 10 कोटी रुपये असेल. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांतील 75 तालुक्यांपर्यंत विस्तारली आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये निर्माण केलेली स्पर्धा आहे. स्पर्धेचा पाया हा ज्ञान आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थीना 'पानी फाऊंडेशन’ पाणलोट विकासाच्या विज्ञानाचे प्रशिक्षण देते. त्यानंतरच हे गावकरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत भाग घेतात. 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारुन पाणी साठवण क्षमता निर्माण करतात.

गेल्या वर्षी झालेल्या ‘दुसऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत 30 तालुक्यांतील एकूण एक हजार 321 गावांनी भाग घेतला आणि तब्बल 8361 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण केली. त्यात वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील काकडदरा या छोट्याशा आदिवासी गावाने बाजी मारत वॉटर कप 2017 जिंकला.

निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक गाव स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असून त्यांना आमीर खान यांच्या सहीचे आमंत्रण पत्र पाठवलं गेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वॉटर कप स्पर्धेचा प्रवास आणि हेतू स्पष्ट करणारे भव्य छायाचित्र प्रदर्शन या सर्व 75 तालुक्यांत आयोजित करण्यात आलं असून त्याला लाखो ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. स्पर्धेची प्रवेशिका दोन भागांत आहे. आतापर्यंत साधारणपणे 7 हजार गावांनी प्रवेशिकेचा पहिला भाग सादर केला आहे.

अर्जाच्या दुसऱ्या भागात गावाने ग्रामसभा घेऊन ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे घेतल्या जाणाऱ्या चार दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाच प्रशिक्षणार्थीची निवड करायची आहे. दुसऱ्या भागाची प्रवेशिका पूर्ण करुन पाठवण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018 आहे. निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन पाणी आणि समृद्धी करीता आपला प्रवास सुरु करावा, असं आवाहन ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे करण्यात आलं आहे.

सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरलेल्या 75 तालुक्यांची नावं

उत्तर महाराष्ट्र विभाग

  • जिल्हा : जळगाव, तालुका : अमळनेर, पारोळा

  • जिल्हा : नंदुरबार, तालुका : शहादा, नंदुरबार

  • जिल्हा : धुळे, तालुका : धुळे, सिंदखेड

  • जिल्हा : नाशिक, तालुका : चांदवड, सिन्नर

  • जिल्हा : अहमदनगर, तालुका : जामखेड, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, कर्जत


पश्चिम महाराष्ट्र विभाग

  • जिल्हा : सातारा, तालुका : माण, खटाव, कोरेगाव

  • जिल्हा : सोलापूर, तालुका : सांगोला, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी, माढा, मंगळवेढा

  • जिल्हा : सांगली, तालुका : आटपाडी, जत, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव

  • जिल्हा : पुणे, तालुका : बारामती, इंदापूर, पुरंदर


विदर्भ विभाग

  • जिल्हा : बुलडाणा, तालुका : मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर

  • जिल्हा : अकोला, तालुका : अकोट, पातुर, बार्शी टाकळी, तिल्हारा

  • जिल्हा : वाशिम, तालुका : कारंजा, मंगरुळ पीर

  • जिल्हा : अमरावती, तालुका : धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव

  • जिल्हा : यवतमाळ, तालुका : राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी, धारवा

  • जिल्हा : वर्धा, तालुका : अर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू

  • जिल्हा : नागपूर, तालुका : नरखेड


मराठवाडा विभाग

  • जिल्हा : औरंगाबाद, तालुका : खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर

  • जिल्हा : बीड, तालुका : केज, धारुर, अंबाजोगाई, अष्टी, परळी वैजनाथ

  • जिल्हा : उस्मानाबाद, तालुका : कळंब, भूम, परांडा, उस्मानाबाद

  • जिल्हा : हिंगोली, तालुका : कळमनुरी

  • जिल्हा : परभणी, तालुका : जिंतूर

  • जिल्हा : नांदेड, तालुका : भोकर, लोहा

  • जिल्हा : जालना तालुका : जाफराबाद

  • जिल्हा : लातूर तालुका : औसा, निलंगा, देवणी