अहमदनगर : देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. सुप्रीम कोर्टाचं कामकाज व्यवस्थित होत नसल्याची कबुली खुद्द न्यायमूर्तींनीच दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही हे देशाचं दुर्दैव असल्याचं म्हटलंय.
''अहमदनगरमध्ये अण्णा बोलत होते. न्यायमूर्तींच्या पत्रानंतरही अंमलबजावणी होत नाही, हे अतिशय गंभीर आहे. लोकशाहीला हे धोकादायक आहे. देशाच्या इतिहासात हा काळा दिवस असून काळा डाग अजून गडद झाला,'' असा हल्लाबोल अण्णांनी केला.
न्यायमूर्तींनी वास्तव मांडल्याने त्यांचं अभिनंदन करावं, असंही अण्णांनी म्हटलंय.
''न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. देशाचा कारभार कायद्याच्या अधारावर चालतो. अनेकांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळून लोकशाही आली. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाकडे बोट करत असल्यास ते दुर्दैव आहे. यामुळे लोकशाहीला धोका असून सामान्य माणसाला न्याय कसा मिळेल'', असा सवाल अण्णांनी केला.
''सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या दबावात येण्याचं कारण नाही. न्यायव्यवस्था स्वायत्त असून सरकारला वाकवू आणि झुकवू शकते'', असंही अण्णा म्हणाले. तर ''न्यायमूर्ती पत्रांची दखल घेत नसल्याने संशयाला वाव मिळतोय. आगीच्या ठिकाणीच धूर निघतो'', असा टोलाही अण्णांनी लगावला.
दरम्यान, अशा परिस्थितीत जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे, असं आवाहन अण्णांनी केलं.
संबंधित बातम्या :
सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता
सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?
सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील
न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?