पंढरपूर : विठ्ठल मंदिराला पुरातन रूप देण्याच्या कालच्या बैठकीतही आराखड्याला अंतिम रूप देता आले नाही. आता आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत दुपारी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान कालच्या बैठकीत संत नामदेव पायरी सुशोभीकरण आणि नवीन दुमजली दर्शन रांग करण्यावर चर्चा झाल्याने मंदिराचा आराखडा आता 55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आज (बुधवारी) नीलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निधीसाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. 
   

  
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूरला येणार असून यावेळी मंदिराच्या आराखड्याबाबत मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे. कालच्या बैठकीनंतर बोलताना मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आज होणाऱ्या बैठकीत या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाणार असून यानंतर पुरातत्व विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडे हा आराखडा मंजुरीसाठी दिला जाणार आहे. या आराखड्यामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झालेल्या नामदेव पायरीबाबत तीन वेगवेगळ्या मॉडेलवर चर्चा झाली आहे. याशिवाय दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिराकडे येणारी रांग मंदिराबाहेरून आणि मंदिराच्या भिंतीला स्पर्श न करता करण्याबाबत चर्चा झाली. सध्याच्या दर्शन रांगेमुळे मंदिराच्या भिंतीला भविष्यात धोका होऊ शकणार असल्याने आता मंदिराच्या बाहेरच्या बाजूने दोनमजली स्टीलमधील दर्शन रांग उभारण्याबाबत चर्चा झाली आहे. यामुळे आराखड्यात 15 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. 


पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रुप देण्यासंदर्भातील आराखडा


पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला पुरातन रुप देण्यासाठी आराखडा बनवण्यात आला आहे. विठुरायाच्या राउळीला 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्याच्या आराखड्याबाबत काल (मंगळवारी) अंतिम बैठक होणार होती. परंतु, या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आज पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर अंतिम मंजूर केलेला हा आराखडा परवानगीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे सादर केला जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. 


या कामामध्ये रासायनिक प्रक्रियेने विठ्ठल मंदिराचे मजबुतीकरणाला साधारण साडे आठ कोटी रुपये एवढा खर्च होणार असून मंदिराच्या स्ट्रक्चरल मजबुतीकरणाला साडेचौदा कोटी खर्च होणार आहे. विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही यासाठी साडे सहाकोटी खर्च अपेक्षित आहे. याशिवाय नव्याने उभ्या कराव्या लागणाऱ्या वास्तूसाठी साडे अकरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एकंदर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना मंदिराची आर्थिक परिस्थिती पाहून प्राधान्यक्रम ठरवून ही कामे हाती घेतली जाणार आहेत. गेल्या दीड वर्षांपासून कोरोना काळामध्ये मंदिराला 32 कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागला असल्याने या कामासाठी शासनाकडूनही आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. देशभरातील भाविकांना मंदिराच्या कामासाठी आर्थिक मदत करण्याचेही आवाहन केले जाणार आहे.    


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रुप देण्यासंदर्भात आराखडा आज ठरणार; 40 ते 50 कोटींचा खर्च अपेक्षित