Pandharpur News Updates: कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांना सलग 17 दिवस अहोरात्र दर्शन देत उभ्या असलेल्या परब्रह्म पांडुरंगाला आजपासून नियमित विश्रांती मिळणार असून देवाच्या प्रक्षाळ पूजेनंतर राजोपचाराला आजपासून सुरुवात झाली. कार्तिकी यात्रेसाठी 28 ऑक्टोबर रोजी देवाचा पलंग काढून 24 तास दर्शनाला सुरुवात झाली होती ती आज 13 नोव्हेंबर रोजी प्रक्षाळ पूजा संपली असून आजपासून देवाचे सर्व राजोपचार सुरु होणार आहेत. 


सलग 17 दिवस अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठुरायाचा थकवा आणि शिणवटा घालविण्यासाठी ही प्रक्षाळ पूजा करायची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आज भल्या पहाटे विठुरायाच्या चरणाला लिंबू आणि साखर चोळून ठेवण्यात आली. यांनतर संपूर्ण मंदिर धुवून साफ करण्यात आले. दुपारी देवाच्या प्रक्षाळ पूजेस सुरुवात झाली. मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नांदगिरे यांच्या हस्ते विठ्ठलाची तर अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते रुक्मिणीमातेकडे पूजा करण्यात आली. या पूजेत पारंपरिक पद्धतीने ब्रम्ह वृंदांच्या उपस्थितीत मंत्रपठण करीत देवाला गरम पाण्याने रुद्राभिषेक करण्यात आला.  


रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात असते. 


यानंतर देवाला पारंपरिक मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले. यात  मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हिऱ्यांचा नाम, दंडाला दंड पेट्या आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळस माळ, मारवाडी पेठ्यांचे हार, मोठा लफ्फा आणि मोत्याचे कंठे घालण्यात आले. कानाला हिरेजडीत मस्य जोड अशा पोशाखात नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते. रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते. या पूजेनंतर देवाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात आला आणि देवाची महाआरती करण्यात आली . कोरोना  संकटामुळे विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवाच्या जोडीने गेली 17 दिवस अहोरात्र  उभी असलेली जगन्माता रुक्मिणी मातेचीही आज पवमान अभिषेकाने प्रक्षाळ पूजा करण्यात आली . यावेळी रुक्मिणी मातेलाही हिरे मणक्यांच्या पारंपरिक दागिन्याने सजविण्यात आले होते. 


अखंड परिश्रमानंतर आजपासून देव आपल्या शयनकक्षात विश्रांतीसाठी जाणार असल्याने आज देवाचा पलंग बसविण्यात आला. सुगंधी फुलांनी मंदिर आणि देवाचे शयनकक्ष सजविण्यात आला होता . पुणे येथील भाविक अमोल शेरे आणि मोहिते यांनी  हि  सजावटीची सेवा दिली. देवाचा शिणवटा घालविण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनविण्यात आलेला 14 आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा देवाला देऊन देवाची शेजारती होऊन देव विश्रांतीला गेले. देवाला हे सर्व उपचार होत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जात असल्याची अनुभूती पदोपदी जाणवत राहते . सुरुवातीला थकलेला देवाचा चेहरा पूजेनंतर मात्र अत्यंत तेजस्वी आणि प्रसन्न झाल्याचे पाहावयाला मिळते. उद्यापासून विठ्ठल रुक्मिणीचे राजोपचार नियमितपणे सुरु होणार आहेत.