मुलगा होत नसल्याने पत्नी आणि तीन मुलींना दीड वर्षे डांबून ठेवलं, पंढरपुरातील धक्कादायक प्रकार
वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, अशी मानसिकता आजही अनेक कुटुंब, पती-पत्नींमध्ये पाहायला मिळते. मुलासाठी अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत हे पंढरपुरातील घटनेवरुन समोर आलं आहे.

पंढरपूर : मुलगा होत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या पत्नीसह तीन मुलींना घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. डांबून ठेवलेल्या पीडित विवाहित महिलेसह तीन मुलींची निर्भया पथकाकडून सुटका करण्यात आली आहे. मुलासाठी आजही असे अतिशय धक्कादायक प्रकार घडणं चिंताजनक आहेत. यातील आरोपी पती दत्तात्रय बर्डे याच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगा होत नाही म्हणून आरोपी दत्तात्रय बर्डेने पंढरपूर शहरातील झेंडे गल्लीतील एका घरात दीड वर्षापासून पत्नीसह तीन मुलींना डांबून ठेवलं होतं. या काळात त्याने आपल्या पत्नी आणि मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची माहिती समोर येत आहे. निर्भया पथकाला या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुले, गणेश इंगोले, अरबाज खाटीक, कुसुम क्षीरसागर, निता डोकडे, चंदा निमगिरे आणि अविनाश रोडगे यांनी साध्या वेशात घटनास्थळी जाऊन कारवाई करत त्यांची सुटका केली.

यावेळी संबंधित महिला आणि तिन्ही मुली अत्यंत घाबरलेल्या खोलीतील कोपऱ्यात बसलेली दिसून आली. दीड वर्षांपासून समाजापासून दूर एका खोलीत डांबून ठेवल्याने ही महिला आणि मुली अतिशय घाबरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला 4 जूनपंर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.























