पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आता पक्षातूनच आवाज उठू लागले आहे. तुम्हाला उमेदवारी कशी मिळतेय ते पाहतो असे थेट आवाहन भारत भालकेंचे सहकारी आणि माजी आमदार कै औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी दिले आहे. याला कारण ठरले राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाला काढून भगीरथ भालके यांनी त्यांच्या मर्जीतले विजय देशमुख यांना त्या पदावर बसवले आणि यातूनच पक्षातील एक मोठा गट नाराज झाला.


या गटात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज विठ्ठल हॉस्पिटलमध्ये भर दुपारी एक बैठक घेत भगीरथ भालके यांचे नाव न घेता सडकून टीका केली. भगीरथ भालके ज्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बसले आहेत त्या कारखान्यातही भालकेंच्या विरोधात पॅनल लढवण्याची घोषणा युवराज पाटील यांनी केली. तसंच तुम्हाला पोटनिवडणुकीच्या तिकीट कसे मिळते असे आव्हान देखील युवराज पाटील यांनी दिले आहे.


युवराज पाटील हे पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार कै औदुंबर पाटील यांचे नातू असून भालके नेतृत्व करत असलेला विठ्ठल परिवार कै औदुंबर पाटील यांचा आहे. भगीरथ भालके यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचे समर्थक असलेले नूतन तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांनी मात्र भारत भालके यांच्या जागी भगीरथ भालके यांना तिकीट दिले नाही तरी तेच निवडून येतील असे आव्हान दिले आहे. काल राष्ट्रवादीच्या निरीक्षकांनी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघासाठी नुकतीच बैठक घेत उमेदवारीबाबत मते जाणून घेतली होती. यानंतर झालेल्या वेगवान घडामोडीत आज राष्ट्रवादीच्या बैठकीत थेट भगीरथ भालके यांना आवाहन देण्यात आले आहे.


युवराज पाटील हे शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात असून पाटील घराणे गेल्या तीन पिढ्यांपासून पवार यांच्या कुटुंबाच्या जवळचे मानले जातात. भारत भालके यांच्या जागेवरील पोटनिवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी राष्ट्रवादीतच सुरु असलेल्या संघर्षामुळे भगीरथ भालके यांच्या पुढील अडचणी वाढणार आहेत.