नाशिक : राष्ट्रवादीचे फायर ब्रँड आमदार म्हणून ओळख असलेल्या दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार साहेब, अजित दादा, तिथले पालकमंत्री निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेतात. तिथे असलेल्या लोकांना योग्य तो न्याय दिला जाईल असा मला विश्वास आहे, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार म्हणाले की, परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कुणी अशी मागणी केली म्हणून लगेच ती पूर्ण होईल असं होत नाही, असं देखील रोहित पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटलांच्या मुद्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील कोल्हापूरकला जातील पण कोल्हापुरकर त्यांच स्वागत करतात का हे बघू. तसंच एकनाथ खडसे ईडीला समोर जातील. राजकीय पद्धतीने जर अशी संस्था वापरत असतील तर अयोग्य आहे, असं ते म्हणाले. राज्यपाल आमदार नियुक्ती बाबत विलंब होत असेल तर सर्वसामान्य लोक पण आक्षेप घेतात. आपण संविधानाला धरून चालणारे आहोत. आपल्या पदाचा वापर कोणी अस करत असतील आणि राजकीय हेतुने काम करतील तर हे लोकांना पटणार नाही, असं ते म्हणाले.
भारत भालके यांच्या निधनाने रिक्त जागेवर पार्थ पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
महाविकास आघाडीचे नेतेमंडळीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं उल्लंघन करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नाशिक दौऱ्यातही आज असंच काहीस चित्र दिसून आलं. रोहित पवार हे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असून शहरात ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी कार्यालयात तर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याठिकाणी तुफान गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा इथे उडालाच तसेच रोहित पवारांसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी चेहऱ्यावर मास्क देखील परिधान केले नव्हते. याबाबत रोहित पवारांना पत्रकारांना विचारणा केली असता कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. पण काळजी घ्यायलाच हवी असं त्यांनी म्हंटलय.
भालके यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून भालकेंची उर्वरित टर्ममध्ये त्यांची राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी हा पर्यायावर विचार सुरू झाला आहे. भारत भालके हे थेट जनतेचे आमदार म्हणून जशी त्यांची ओळख होती. तसे त्यांनी त्यांचा वारसदार ही तयार केलेला नव्हता. त्यांच्या अकाली जाण्याने अनेक प्रश्न तयार झाले असून त्यांच्या ताब्यात असलेला विठ्ठल कारखानाही आधी अडचणीतून बाहेर काढावा लागेल असे स्पष्ट वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानुसार भालके यांचे पुत्र भगीरथ यांना नुकतेच भालकेंच्या जागी कारखान्याचे अध्यक्ष केले आहे. पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ यांना उमेदवारी दिली तर विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक व उद्योगपती समाधान वाटाडे यांच्यातील एकसोबत लढत होऊ शकेल. जनतेची सहानुभूती जरी भगीरथ यांच्यासोबत असली तरी अनुभव नसल्याने पक्ष धोका पत्करू शकत नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी उमेदवारी बाबत वक्तव्य करणे टाळत संभ्रम ठेवला आहे.