कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच भाजप पक्षावर जोरदार टीका केली. एका खासगी कार्यक्रमासाठी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. देवेंद्र फडणवीस इस्लामपूरमध्ये येत आहेत मात्र ते स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि पक्षाला स्थिरस्थावर करण्यासाठी येत आहेत. अनेक वेळा ते आले आहेत आणि बोलून गेले आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.


'खडसेंना दिलेल्या ईडीच्या नोटीसीची भीती नाही'


राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात जातो त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे. देश हिताच्या निर्णयपेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.


पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यावर चर्चा नसल्याची माहिती


मंगळवेढा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय आहे तो होईल, असंही ते पुढे म्हणाले. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शिवाय या आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ घेता येईल असे देखील ते म्हणाले.


निधी वाटपात सरकार दुजाभाव करत असल्याचा गैरसमज विरोधकांना झाला आहे. कोरोनाच्या संकटात निधी वाटपात थोडं मागेपुढे वाटलं असेल पण येणाऱ्या काळात समान वाटप होईल, यात शंका नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं.