पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे सर्वच महापुरुषांचे सर्व प्रेरणादिनाचे उत्सव घरात बसूनच करावे लागत असताना पंढरपुरातील एका अवलिया शिवभक्ताने आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आपल्या घरावर छत्रपतींचा 8 फुटी अश्वारूढ पुतळा उभारला आहे . पंढरपुरातील विष्णू शेटे असे या शिवभक्ताचे नाव असून विष्णू रिक्षा चालक आहे .


छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचा श्वास असल्याने त्यांचे कोट्यवधी शिवभक्त जगभर आहेत . छत्रपतींच्या विचाराचा वारसा चालवताना शिवभक्त महाराजांच्या चरित्रातील प्रत्येक प्रसंग साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात . गावोगावी छत्रपतींचे प्रेरणादायी पुतळे उभे असले तरी विष्णू सारखा शिवभक्ताने आता आपल्या घरावर छत्रपतींचा पुतळा उभा करीत महाराजांवरील प्रेम व्यक्त केले आहे .


सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन असताना पंढरपूर तालुक्यातील कौठाळी या गावाच्या एका शिल्पकाराकडून त्याने हा पुतळा बनवून घेतला आहे . गेल्या दोन महिन्यापासून या पुतळ्याचे काम सुरु होते. दोन दिवसापूर्वी हे काम पूर्ण झाल्यावर काल क्रेनच्या साहाय्याने हा पुतळा घराच्या छतावर बसविण्यात आला . शिवराज्याभिषेकाच्या दिवशी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्याहस्ते या पुतळ्याला महाभिषेक करून त्याची स्थापना करण्यात आली आहे . विष्णूने उभारलेला हा छत्रपतींचा पुतळा सध्या शहरात कुतूहलाचा विषय बनला असून अनेक शिवभक्त हा पुतळा पाहण्यासाठी आता विष्णूच्या घरी जात आहेत.


अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर हे सोहळा संपन्न होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा या सोहळ्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक घरीच राहुन साजरा करण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते.


Shivrajyabhishek Sohala 2020 | किल्ले रायगडावरुन शिवराज्याभिषेक सोहळ्याची EXCLUSIVE दृश्ये