पालघर : वाडा तालुक्यातील मोहोट्याचा पाडा येथे आज (6 जून ) पहाटेच्या सुमारास मैत्री पाटील या दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज गावात तीव्र आंदोलन छेडत आरोग्य विभागाचा निषेध नोंदवला. तसेच, घटनेची चौकशी करून दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.
मोहोट्याचा पाडा येथे शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील एक डॉक्टर कुलदैवतांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते डॉक्टर करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मोहोट्याचा पाडा येथील सात नागरिकांना पोशेरी येथे क्वॉरंटाइन केले होते. या सात जणांमध्ये मैत्री पाटील ही मुलगीही होती. या सर्वांना 2 जून रोजी क्वॉरंटाइन करण्यात आले होते. परंतु, मैत्री हिला ताप व उलट्या होत असल्याने पोशेरी येथून वसई येथील गोल्डन पार्क या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, येथेही तिला फरक न पडल्याने तिला भाईंदर येथील नेपचुन रूग्णालयात दाखल केले गेले. अखेर प्रकृती अधिकच खालावल्याने तिला ठाणे येथील ज्युपिटर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. मात्र, येथे तिची प्रकृती आणखी खालावून उपचारादरम्यान आज पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.
लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांत विकले तब्बल 20 टन अंजीर
आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
ज्युपिटर रूग्णालयात तिची कोरोना तपासणी केली असता अहवाल नकारात्मक आला आहे. मात्र, तिचा मलेरिया, डेंग्यू या तापाने मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. योग्य उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आज गावात तीव्र आंदोलन छेडीत आरोग्य विभागाचा निषेध नोंदवला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच, या घटनेची चौकशी करून दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे.
#CORONA खासगी रुग्णालयांचे 80% बेड्स कागदावरच,रुग्णांना खाटा मिळत नाही हे वास्तव-देवेंद्र फडणवीस