लातूर : मराठा आरक्षणानंतर आता इतर समाजही आरक्षणासाठी हळूहळू आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचे आश्वासन पाळले नाही, तर 1 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा लिंगायत आरक्षण कृती समितीनं दिला आहे. आज लातूरमध्ये समितीची बैठक झाली, त्यावेळी हा ठराव करण्यात आला.


लिंगायत आरक्षणावर 15 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेऊ, असं आश्वासन 19 ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यामुळे आता तारीख उलटून गेल्यानंतर लिंगायत समाजही आक्रमक झाला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय ज्या तत्परते घेण्यात आला, त्याचे आम्ही स्वागत करतो. त्याप्रमाणेच लिंगायत आरक्षणाबाबत निर्णय का घेतला जात नाही? असा सवाल कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती केला.


लिंगायत आरक्षणाबाबत लवकर निर्णय न घेतल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याच इशारा यावेळी देण्यात आला. तसेत येत्या 1 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचंही लिंगायत आरक्षण कृती समितीनं स्पष्ट केलं.