पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदान प्रक्रिया आणि निवडणूक कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. या निवडणुकीसाठी सर्व कोविड रुग्णांनाही आपला मतदानाचा हक्क बजावता येईल, अशी सर्व तयारी प्रशासन करणार असून आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी तयारीची पाहणी केली. 


यावेळी बोलताना त्यांनी कोविडच्या वाढत्या धोक्यामुळे सर्व मतदारांनाही मतदानाच्यावेळी कोविडचे नियम पाळून मतदान करावे लागणार असून प्रत्येक मतदाराची थर्मल तपासणी मतदान केंद्राबाहेर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मतदारांना मास्क बंधनकारक असणार असून ज्यांच्याजवळ मास्क नसेल त्याला प्रशासनाकडून मास्क दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व राजकीय पक्ष आणि मतदारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही देशपांडे यांनी केले. 




दरम्यान आज पंढरपूर शहराबाहेर भटुंबरे हद्दीजवळ एका व्यापाऱ्याकडून 11 लाख 17 हजार 500 रुपयांची रोकड भरारी पथकाने पकडल्याने खळबळ उडाली आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. आज मुख्य निवडणूक आयुक्त पंढरपूरमध्ये असताना पुणे-विजापूर मार्गावर पुणे इथले व्यापारी दर्शन तुरेकर आणि अनुराग अवस्थी यांच्या मारुती इको या गाडीला भरारी पथकाने तपासणीसाठी थांबवले असता यात ही रोकड मिळाली आहे. भरारी पथकाने कारवाई करत या रकमेचा पंचनामा केला आणि ती जप्त केली आहे. उद्या मुख्य निवडणूक आयुक्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेणार असून कोविड काळात निवडणुकीसंदर्भात घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.