मुंबई : मुंबईचे पोलिस महासंचालक परमवीर सिंह यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचंही गृहमंत्री पद जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज देशमुख यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळल्याचं प्रकरण ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांनी हाताळलं आहे, त्यावरुन पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. शरद पवार यांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली आहेत. त्यांनी गृह विभागाच्या कामकाजाविषयी माहिती घेतल्याचं देखील सूत्रांकडून कळलं आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले अनिल देशमुख
मुकेश अंबानी याच्या घरासमोर स्पोटकं सापडल्याच्या प्रकरणाचा तपास आता एनआयए आणि एटीएस करत असून एनआयएला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. त्यांच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पोटकं सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती. मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं. ते म्हणाले की, "मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्पोटकं सापडली होती त्याचा तपास आता एनआयए आणि एटीएस चांगल्या प्रकारे करत आहेत. एनआयएच्या तपासाला राज्य सरकारच्या वतीनं संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही संरक्षण देण्यात येणार नाही."
सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता
अँटिलियाजवळ स्फोटकं सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तकडाफडकी बदली देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना एनआयए माहिती घेण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे.
एनआयएने हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतल्यानंतर वेगाने हालचाली होताना दिसत आहेत. येत्या एक-दोन दिवसात या सर्वांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सीआययू (क्राईम इन्वेस्टिगेशन युनिट) मध्ये नियुक्त होते. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट पोलीस कमिश्नर मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे सचिन वाझे यांना बंधनकारक होतं. मात्र, सचिन वाझे हे डायरेक्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपर्कात होते. यामुळे सचिन वाझे यांची कामाची कार्यपद्धती एनआयएच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे.
सचिन वाझे यांनी अनेक महत्त्वाच्या केसेसचा तपास केला आहे. टीआरपी केस, फेक फॉलोवर केस, डीसी कार केस आदी अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास केला आहे. या केसेस सचिन वाझे यांच्याकडे कशा गेल्या. त्या केसेस माहितीच्या आधारावर झाल्या आहेत की कशा प्रकारे झाल्या आहेत. सचिन वाझे यांच्याकडे केसेस कशा सोपवल्या जायच्या. जिलेटिन कार प्रकरण वाझे यांच्याकडे का देण्यात आलं. त्याचा प्रमुख तपास अधिकारी म्हणून सचिन वाझेंना कुणी आणि का नेमलं? प्रोसिजरने नेमले की इतर काही कारण होत, अशा अनेक मुद्यांवर मिलिंद भारंबे आणि इतर आधिकाऱ्यांकडे चौकशी केली जाणार असल्याचं समजतंय.