पंढरपूर : काल झालेल्या मतमोजणीत निसटत्या मताने पराभव झाला असला तरी आज सकाळपासून पुन्हा कामाला सुरुवात केली असून जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त 15 हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला. सर्व शक्ती एकत्र येऊन आपल्या विरोधात लढल्या असल्या तरी मतदारसंघातील जनतेने गेल्यावेळी पेक्षा 15 हजार मतांची वाढ झाली आहे. आपले वडील देखील 2004 साली पहिल्यांदा पराभूत झाले होते, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर 3 वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिली असून पुढच्या वेळी या पराभवाचे उट्टे काढेन असे भगीरथ भालके यांनी सांगितले.
विजयी झाल्यावर वडिलांप्रमाणे शड्डू ठोकण्याचा प्रयत्न विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बाजूला राहून शड्डू ठोकण्यापेक्षा 2024 च्या निवडणुकीत समोर या मग शड्डू कोण ठोकतोय ते दाखवून देईन असा टोला भगीरथ यांनी लगावला. आजही भारत भालके यांच्याच प्रमाणे कार्यकर्त्यांची गर्दी भगीरथ यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात दिसत असून पराभूत झाले तरी आम्ही तुमच्या सोबत असल्याचे कार्यकर्ते दाखवून देत आहेत, असं ते म्हणाले.
रात्री आमदार झालेल्या समाधान आवताडेंची सकाळपासून कामाला सुरुवात
एका बाजूला निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचे वास्तव असताना आता काल रात्री आमदार झालेले समाधान अवताडे यांनी आज सकाळपासून थेट कमला सुरुवात केली आहे. आज मंगळवेढा आणि नंतर पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठक घेत कोरोना उपाययोजनांबाबत त्यांना सूचना दिल्या. काल जरी आमदार झालो असलो तरी आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नसून कोरोनाचे संकट वाढत चालल्याने पहिल्यांदा त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळीपासून कामाला सुरुवात केल्याचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. सध्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यात नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत असून कोविड केअर सेंटर देखील फुल झाल्याने नवीन जागांची व्यवस्था उभी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. सध्या पंढरपूरमध्ये ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा जाणवत असून तीच अवस्था रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत होत असल्याने जादाचा साठा मिळवण्याबाबत प्रयत्न सुरु केल्याचे अवताडे यांनी सांगितले.
पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?
माझ्याजवळ केवळ साडेतीन वर्षाचा कालावधी असल्याने पहिल्यांदा कोरोना संकट आणि नंतर पाणी प्रश्नासह इतर अडचणी सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी वेळ व जादा आव्हाने असल्याने वेळेचे नियोजन करत वेगाने कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून जनतेचा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पडणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.