मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी सोमवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर आपली परखड मत मांडत काही गौप्यस्फोटही केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेनं काम करत आहे, अशा वेळी जनतेनंही सबुरीनं चाललं पाहिजे असं आपलं मत असल्याचं आशिष शेलार म्हणाले.


सध्या चर्चेत असणाऱ्या अदर पुनावाला धमकी प्रकरणावरही त्यांनी आपलं मत मांडत एक गौप्यस्फोट केला. या प्रकरणात अधिकृत भूमिका पुनावाला आणि केंद्र सरकारच घेऊ शकतात. पण, पुनावालांना सुरक्षा का मागावी लागली हा प्रश्न मात्र गंभीर असल्याटं ते म्हणाले. 'कोणत्याही स्थानिक पक्षाचा या प्रकरणात हात असेल तर हे प्रकरण गंभीर आहे. सदर प्रकरणाबाबत आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. योग्य वेळ येताच ती सर्वांसरमोर आणली जाईल, तेव्हा यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार रहावं', अशा इशारा शेलार यांनी दिला. 


भाजपला पश्चिम बंगालमध्ये पूर्ण विजय मिळाला नाही हे खरं. पण, यशाचं मोजमाप करायचं झाल्यास यशाचा पगडा भाजपकडेच आहे. कम्युनिस्ट रसातळाला गेले, काँग्रेसचं बाष्पीभवन झालं. ममता बॅनर्जी यांची म्हणावी तशी वाढ झाली नाही. मागील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशाचं मोजमाप भाजपकडेच आहे. आता या यशात दावेदार कोण, छुपे, उभे- आडवे हात कोणाते, हे ज्यांचं चिन्हं हात आहे यांनी ठरवावं असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचीही शाळा घेतली. 


न मागताही पुनावाला यांना केंद्रानं सुरक्षा का पुरवली? नाना पटोले यांचा सवाल 


आव्हाड म्हणत असतील तर ती अदृश्य शक्ती आणि अदृश्य हात कोणाचा असेल तर याची चिंता काँग्रेसनं करावी. स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, या प्रवृत्तीची प्रतिची म्हणजे पंढरपूरच्या निवडणुकीचं विश्लेषण न करता पश्चिम बंगालच्या निकालांमध्ये अदृश्य हात आहे म्हणायचं. यातून जनतेचं प्रबोधन शक्य नाही अशा शब्दांत शेलार यांनी जितेंद्र आव्हाडां यांना टोला लगावला. बंगालच्या विजयात पवारांच्या अदृश्य हातावरून शेलारांनी आव्हाडांना पंढरपुरच्या पराभवाची आठवण करून दिली. 


संजय राऊत यांच्यावर साधला निशाणा 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगाव आणि पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर केलेलं वक्तव्य पाहता, या मुद्द्यांवर बोलण्याची संजय राऊत आणि शिवसेनेची औकात नाही अशा शब्दांत शेलार यांनी त्यांचा समाचार घेतला. ज्यांचं सरकार कुबड्यांच्या आधारावर आहे, जे त्या आधाराशिवाय एक पाऊलही टाकू शकत नाहीत अशा पक्षानं इतर पक्षांच्या यशाबद्दल बोलण्यात अर्थ नसल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेवर घणाघात केला. 


नाना पटोले, म्हणजे उचलली जीभ.... 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार होण्यास केंद्र सरकारला कारणीभूत धरलं होतं. याच मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी त्यांनाही निशाण्यावर घेतलं. ज्यांचं आयुष्यच काळाकांडीच्या कामांत गेलं असे नाना पटोले काळाबाजाराची माहिती ठेवत असतील. ते कधीही व्यवहारातल्या सत्यतेवर चर्चा करत नाही, माहितीही ठेवत नाहीत. 'उचलली जीभ...' अशा म्हणीचा वापर करत कोणीही नाना पटोलेंच्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करत नाहीत असा जोरदार टोला त्यांनी लगावला. 


राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याशी धमकीवजा भाषेत बोलल्याप्रकणी सध्या भाजवर महाविकासआघआडीतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावर वक्तव्य करताना ज्या वेळी भाषेवर चर्चा होते आणि प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा आमच्याकडे बोटं दाखवण्याऐवजी पाच बोटं त्यांच्यावर आहे हेसुद्धा लक्षात ठेवावे असा इशारा शेलारांनी दिला.