कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा आता प्रदूषणामुळे काळवंडली आहे. याचा फटका नदीकाठच्या नागरिकांना तसेच जलचरांना बसला असून इचलकरंजी शहराजवळ असलेल्या तेरवाड बंधाऱ्यावर लाखो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसत आहेत. या प्रश्नावर तेरवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बांधून ठेवल्याचा प्रकार घडलाय.


पंचगंगा नदीत इचलकरंजी शहरातील उद्योगधंद्यातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. त्याचा परिणाम म्हणून लॉकडाउनच्या काळात शुध्द झालेली पंचगंगा आता पुन्हा प्रदूषित बनली आहे. तेरवाडच्या बंधाऱ्यावर लाखो मृत माशांचा खच पडल्याचं पहायला मिळतंय.


पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात नदीकाठच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलन केले आहेत. पण याची दखल ना प्रशासनाने घेतली ना सत्ताधाऱ्यांनी. इचलकरंजी शहरातील उद्योगधंद्यांचे प्रदूषित पाणी नदीत मिसळतच राहिले. यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. आता तर लाखो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसताहेत.


याविरोधात आता तेरवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवल्याचा प्रकार घडला. पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. पंचगंगा नदीच्या या प्रदूषणाचा फटका हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर बसतोय. पुढे ही नदी सांगली जिल्ह्यात जाते.


मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
प्रशासनाने या मृत माशांची नदीतून उचलून शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावावी, तसेच नदी काठच्या बंधाऱ्यावर येत्या 72 तासात कलोरिन डोस सुरू करावा अशा प्रकारचा आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव अशोक शिंगारे यांनी दिले आहेत. तसेच इचलकरंजी नगरपालिका मुख्याधकारी यांचेवर प्रदूषण केले या कारणावरून गुन्हा दाखल करणेचे आदेशही त्यांनी दिले आहेत.


महत्वाच्या बातम्या: