नागपूर : विविध मार्गांचा वापर करत चोरांनी लाखो, करोडोंचा ऐवज लंपास केल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत. अनेकदा चोरट्यांनी अशी शक्कलही लढवली आहे, ज्याबाबतची माहिती मिळताच अनेकांच्याच भुवया उंचावल्या. पण, नागपुरात या साऱ्याच्या पलीकडे जाऊन एक अजब चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. जिथं एका कार चालकानं चक्क पोलिसांनी लावलेले जॅमरच पळवले आहेत.


नागपूरमधील अत्यंत दाटीवाटीच्या सदरमधील माऊंट रोड येथे 1 डिसेंबर रोजी वाहतूक शाखेचे कर्मचारी सईद अहमद हसीब बेग या परिसरात आपलं कर्तव्य बजावत होते. याचवेळी 'एमएच 31 एफए 3911' या क्रमांकामी बीएमडब्लू ही आलिशान कार त्यांना माऊंट रोड येथे 'नो पार्किंग' क्षेत्रामध्ये पार्क केली असल्याचं दिसलं. इतर वाहनांना अडथळा होईल अशा रीतीनं ही कार पार्क केल्याची बाब त्यांना आढळली.


कारबाबतची ही बाब निदर्शनास येताच बेग यांनी कारला जॅमर लावले आणि ते इतर कारवाईकरता पुढे गेले. दरम्यान, कार मालक गाडीजवळ आल्यानंतर त्यानं आपल्या कारला जॅमर लावलेले पाहिले आणि दंड भरायचा नसल्यामुळं तो जॅमरसह कार घेऊन पसार झाला.


बेग तिथे आल्यावर त्यांना कार आणि जॅमर दिसले नाहीत. त्यांनी चालकाच्या नंबरवर संपर्क केला. वारंवार संपर्क साधूनही कारचालकानं मात्र त्यांना प्रतिसाद दिला नाही. अखेर बेग यांनी सदर पोलिसांत जॅमर चोरीची तक्रार दिली आहे. सध्या पोलीस यंत्रणा कार चालकाचा शोध घेत आहेत. मात्र लाखोंची कार चालवणारा काहीशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी जॅमर चोरून पळतो ही आश्चर्यकारक घटना नागपुरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.