कोल्हापूर : बांबूपासून पायमोजे तयार केले जातात हे जर तुम्हाला सांगितले तर खरं वाटेल का? नाही ना? पण हे खरं आहे. कोल्हापुरातील नवउद्योजक नवीनकुमार माळी यांनी स्टार्टअप करुन ही निर्मिती सुरु केली आहे. बांबूपासून मायमोजे बनवतात म्हणजे तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले असतील. पण याची सगळी उत्तरं उद्योजकानं दिली आहेत.


तमिळनाडूमधील उद्योजकाच्या मदतीनं कोल्हापूरच्या उद्योजकानं हा अनोखा प्रयोग सुरु केला आहे. बांबूपासून पायमोजे तयार केले जात असून हे ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तमिळनाडूत बांबूपासून सूत तयार केले जाते. तेच सूत कोल्हापूरच्या इचलकरंजीत पायमोजे तयार करण्यासाठी वापरले जाते. हे पायमोजे पर्यावरण पूरक बनवले असून नागरिकांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहेत. हे पायमोजे तयार करण्यासाठी वेगळ्या सेटिंगची मशीन लागत असून ती तैवानवरुन मागवण्यात आली आहे.


या क्षेत्राकडे माळी कसे वळले?
मी अनेक वर्षांपासून बांबूपासून अनेक वस्तू बनवण्याचं काम करत होतो. यामध्ये उत्तम काम होऊ शकतं याचा मला विश्वास होता. पण नेहमीच्या वस्तूंपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा विचार होता. त्यावेळी तमिळनाडूमधील एक उद्योजक मित्र भेटला आणि दोघांच्या विचारातून पुढे बांबूपासन पायमोजे तयार करण्याची संकल्पना समोर आली.


हे पायमोजे बांबूपासून बनवल्यामुळं कसे असतील असा अनेकजण प्रश्न करत आहेत. मात्र, त्याचं उत्तर देखील माळी यांनी दिलं आहे. हे पायमोजे धुता येतात. 24 तास वापरले तरी कोणताही त्रास नागरिकांना होत नाही, असा दावा माळी यांनी केला आहे.


बांबूच्या पायमोजाचे वैशिष्ट्ये काय?




  • पायमोजे नैसर्गिक घटकांपासून बनवले असल्याने त्वचेसाठी चांगले आहेत.

  • पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असल्यानं त्वचा थंड आणि कोरडी राहते.

  • अन्य पायमोजांपेक्षा हे पायमोजे मऊसूत असून धुता येतात.

  • दिवसभर वापरले तरी पायाचा वास येत नाही असा दावा उद्योजकाचा आहे.


पायमोजे हातात घेतल्यानंतर अतिशय मुलायमदार आहेत. वजन नेहमीच्या पायमोजे इतकचं आहे. माळी यांनी केलेला प्रयोग हा महाराष्ट्रातील पहिलाच आहे. सध्या याची विक्री ऑनलाईन आणि स्थानिक दुकानांमध्ये देखील होत आहे.