देशातील प्रमुख दहा प्रदूषित नद्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचा देखील समावेश करण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दशकांपासून पंचगंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र आतापर्यंत कोणत्याही सरकारला पंचगंगा प्रदूषण मुक्त करता आली नाही. शिवाय प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कारवाई देखील केली जात नाही. म्हणूनच आजच्या घडीला पंचगंगा नदीच्या पात्रात लाखो मासे मृत होऊन पडले आहेत.


पंचगंगे नदीच्या पाण्यावर लाखो मृत मासे तरंग असल्याचे दिसते. कोल्हापूर शहराच्या नजीक प्रत्येक बंधाऱ्यावर कमी अधिक प्रमाणात असेच चित्र पाहायला मिळते. पंचगंगा इतकी प्रदूषित झाली असल्याने मासे आपला जीव वाचवण्यासाठी तडफडू लागल्याचे दिसते. या भागातले साखर कारखाने, रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग, शहर आणि मोठ्या गावातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत सोडलं जातं. त्याचंच परिणाम या नदीला जलचरांवर झाला असल्याचे बोलले जात आहे.  


पंचगंगा नदीच्या प्रदूषणास जबाबदार असलेल्या घटकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई देखील सुरू केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. शिवाय पंचगंगा प्रदुषित करण्यास जबाबदार असणाऱ्या साखर कारखानदार, रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग आणि जबाबदार अधिकाऱ्यांना या नदीत बुडवायला पाहिजे, असा संताप कोल्हापूरकर व्यक्त करत आहेत. पंचगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या अनेक गावांना या नदीचे पाणी द्यावे लागते. जनावरांसाठी देखील याच पाण्याचा वापर होतो. मात्र आता जनावर देखील या पाण्याकडे जात नाहीत. गावात येणाऱ्या पाण्याला देखील दुर्गंधी येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.


दरम्यान, पंचगंगा नदीची ही अवस्था काही 1- 2 वर्षात झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषण मुद्दा गाजत आहे. साखर कारखानदार असो किंवा छोटे उद्योग करणारे असो, त्यांनी जर ठरवलं तर पंचगंगा प्रदूषण मुक्त होऊ शकते. हे लॉकडाऊनच्या दरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषित करण्यास जबाबदार असणाऱ्या घटकांनी विचार करण्याची वेळ आली आहे. शिवाय डोळ्यावर पट्टी बांधून काम करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याकडे गांभीर्याने पहावं लागणार आहे.