Beed News Updates : राज्यामध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादी भवनची वीज केवळ लाईट बिल न भरल्यामुळे कट केली आहे. दीड लाख रुपयांची वीज बिल भरायचे कोणी असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत हे विशेष. बीड जिल्ह्यातील एकूण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे पश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी टोलेजंग राष्ट्रवादी भवन बांधण्यात आले आहे.


परळीचे आमदार मंत्री धनंजय मुंडे, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे हे चार आमदार असताना राष्ट्रवादी भवनाचं लाईट बिल मात्र भरलं गेलेलं नाही. 


या पूर्वीचं आघाडी सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये बहुतेक जिल्ह्यात राष्ट्रवादी भवन उभं केलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी भवनाची एकसारखी उभारणी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये छोटेखानी कॉन्फरन्स हॉल जिल्हाध्यक्षांना केबिन त्यासह कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी विशेष उपाययोजना केली आहे.


जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित चर्चा करण्यासाठी या राष्ट्रवादी भवनाचा मोठा फायदा होत होता. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाईट बिल न भरल्यामुळे या राष्ट्रवादी भवनाकडे कार्यकर्ते फारसे फिरकत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी अनेक वेळा शासकीय विश्रामगृहाचा पर्याय वापरताना पाहायला मिळत आहेत. तर बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर हे यापूर्वी जनता दरबार हा राष्ट्रवादी भवनात भरवायचे. आता राष्ट्रवादी भवन अंधारात असल्याने कार्यकर्त्यांना दुसरीकडे जाण्याशिवाय पर्याय नाही


नवे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी भवनात उजेड पाडणार का? 


दोन दिवसापूर्वीच बीडला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे राजेश्वर चव्हाण हे मागच्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचे जिल्ह्याच्या स्थानिक नेत्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यासोबत राजेश्वर चव्हाण यांची कायम उठबस असते.


राजेश्वर चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये नियुक्तीपत्र दिले आणखी राजेश्वर चव्हाण हे बीडला आलेले नाहीत. मात्र स्वाभाविक आहे की बीडला आल्यानंतर ते राष्ट्रवादी भवनाला भेट देतील. किमान राजेश्वर चव्हाण यांच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर तरी आपल्या कामाची सुरुवात अंधारात गेलेलं राष्ट्रवादी भवन उजेडात आणून करतील का असा प्रश्न आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha