Rajesh Tope On Covid-19 Third Wave :  मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे तिसरी लाट आटोक्यात आल्याची परिस्थिती झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील तिसरी लाट आटोक्यात आल्याचे सांगितले आहे. जालना येथील कार्यक्रमात राजेश टोपे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘तिसरी लाट आटोक्यात आली आहे. काळजी करु नका.’ 


जालन्यात रविवारी पल्स पोलिओचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे म्हणाले की, ‘राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. काळजी करण्याचा विषय नाही. राज्यात सध्या दहा टक्के पण रुग्ण राहिलेले नाहीत.‘ मास्क मुक्तीचा निर्णय विचार करून घेणार असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. 
  
तिसरी लाट आटोक्यात आली असल्याची दिलासा देणारी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे दिली. तिसऱ्या लाटेच्या अनुशंगानं आज राज्यात दहा टक्के पण रुग्ण नाहीत. त्यामुळं तिसरी लाट आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आलं आलं आहे. मात्र कोरोना पूर्ण पणे हद्द पार झालाय अशा भ्रमात न राहता मास्क मुक्तीचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा लागेल, अशी माहिती टोपे यांनी दिलीये.


राज्यातील कोरोना स्थिती -
गेल्या दोन महिन्यांपेक्षा आता राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. पॉझिटिव्हिटीमध्येही घट होत आहे. शिवाय राज्यात लसीकरणही चांगल्या प्रमाणात झाले आहे. राज्यात शनिवारी 893 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जवळपास 21 ठिकाणी दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. शनिवारी सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. मुंबईपेक्षाही पुण्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे मनपामध्ये आज 174 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवड मनपामध्ये 66 रुग्णांची भर पडली आहे. त्याशिवाय पुणे ग्रामीण 77 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 89 रुग्णांची भर पडली आहे. ठाणे मनपा परिसरात 21 रुग्णांची नोंद झाली आहे. रायगडमध्ये 24 रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकमध्ये 39, अहमदनगरमध्ये 64, बुलढाणा 42, नागपूर 21 , नागपूर मनपा 23 आणि गडचिरोलीमध्ये 23 नवे रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर, सांगली मिरज कुपवाड मनपा, मालेगाव मनपामध्ये आज एकही रुग्ण आढळला नाही.