पालघर : पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाची हजेरी कायम असून यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, गवत पावली, वीट भट्टी व्यवसायिक तसेच मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसामुळे मासेमारी करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे . 


पालघर जिल्ह्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचही मोठ नुकसान झाल आहे. हवामान खात्याच्या अंदाजानंतर मासेमारी करण्यास बंदी घातली असून मागील चार दिवसांपासून मासेमारी करणारे बोटी समुद्रकिनाऱ्यावर आहेत. त्यातच समुद्रकिनाऱ्यांवर वाळण्यास ठेवलेली सुकी मच्छी देखील पावसाच्या तडाख्यामुळे खराब झाली आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटींसह मच्छी विक्रेत्या महिलांही याचा मोठा फटका सहन करावा लागतोय. 


शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांना देखील सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील बहुतांशी गावांचा उदरनिर्वाह हा मासेमारीवरच चालतोय. मात्र सतत येणारी चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्‍न येथील मच्छीमारां समोर उभा राहिला आहे.


सतत चक्रीवादळाचा बसणारा तडाखा आणि अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांना वारंवार याचा फटका सहन करावा लागतोय. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार मच्छीमारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील मच्छिमार महिलांकडून केला जातोय. शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हालाही सरकारकडून आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी येथील मच्छीमार महिलांकडून केली जात आहे. 


संबंधित बातम्या :