पालघर:  रेल्वे प्रवास, मॉल प्रवेश तसेच इतर अनेक ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी लसीकरणाच्या दोन मात्रा घेणे बंधनकारक असताना पालघर तालुक्यातील एका मृत महिलेला दुसरा लसीकरणाची मात्रा दिल्याचे संदेश व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटी उघडकीस आल्या असून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीने प्रत्यक्षात लसची दुसरी मात्रा न घेता त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.


पालघर तालुक्यातील घिवली येथे राहणार हरेश्वर लोखंडे (70), कुंदा लोखंडे (67) तसेच रेणुका लोखंडे (73) यांनी 7 एप्रिल 2021 रोजी टॅप्स रुग्णालयात लसीची पहिली मात्रा घेतली. त्यानंतर कुंदा लोखंडे आजारी होऊन त्यांचा 21 मे रोजी मृत्यू झाला तर हरेश्वर लोखंडे यांना दरम्यानच्या काळात करोना आजाराने ग्रासल्याने त्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली नाही. त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक असणाऱ्या रेणुका लोखंडे यांनी देखील तसेच दुसरी मात्रा येऊ शकल्या नव्हत्या. एका मृत ज्येष्ठ महिलेसह अन्य दोघांनी प्रत्यक्षात लसीची दुसरी मात्र घेतले नसताना त्यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे संदेश (एसएमएस) प्राप्त झाले. त्याच पद्धतीने या तीनही व्यक्तीला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले असून पालघर जिल्हा परिषदेमधील लसीकरणात मधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.


एकीकडे रेल्वे प्रशासन व राज्य प्रशासन वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचे दाखला असणे अनिवार्य करण्यात आला असताना अशा पद्धतीने लसीकरण प्रत्यक्षात न करता दिले जाणारे बोगस दाखल्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेमधील त्रुटी उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे लस साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना देखील काही ठिकाणी लसींच्या शिल्लक राहिलेल्या कुप्याच्या माध्यमातून काही उद्योगात छुप्या पद्धतीने शासकीय लस साठ्यामधून लसीकरण केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच काही ठिकाणी दुसऱ्या मात्रेसाठीं नागरिकांमध्ये निरुत्साह असल्याने लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी असे प्रकार घडत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.


जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमितपणे लसीकरण सुरू असले तरी लस घेण्यासाठी केंद्रनावरील गर्दी कायम आहे. उद्योगां मध्ये कामाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण देण्यास काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अजूनही सक्रिय असून त्यांच्यावर रोख लावण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरली आहे. मुळातच शासनाकडून प्राप्त होणाऱ्या लससाठा व होणारे लसीकरण यांच्या ताळमेळ बसत नसल्याचे अनेक प्रकारावरून दिसून आले असून शासनातर्फे केली जाणारी लसीकरणाची सक्ती खरोखरच परिणाम ठरत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


याविषयी पालघरचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता सॉफ्टवेअरमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक अपलोड करताना तांत्रिक चूक झाली असण्याची शक्यता वर्तवली. संबंधित चुकीच्या झालेल्या नोंद बाबत वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले आहे असून झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


संबंधित बातमी:


Mumbai Vaccine : मुंबईत 100 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस, आता पूर्ण लसीकरणाचं ध्येय


Mumbai Vaccination : दुसरा डोस का घेतला नाही त्याचं कारण सांगा...मुंबईकरांना थेट महापालिकेचा फोन येणार