पालघर: बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील विराज अलॉय प्लांटमध्ये कामगारांकडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. दोन कामगार युनियनमध्ये वाद झाल्याने ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. या दगडफेकीत बंदोबस्तासाठी असलेले काही पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. 


पालघरमधील विराज ग्रुपच्या विराज अलॉय कंपनीमध्ये युनियन स्थापन करण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला. या नंतर झालेल्या गदारोळमध्ये कंपनीमधील काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये पोलीस मध्यस्थी करण्यासाठी गेले असता काही पोलिसांनाही मारहाण झाली. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले असून मोठा पोलिसांचा फौजफाटा विराज कंपनीच्या दिशेने निघाला.


विराज ग्रुप मध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दोन गटांमध्ये युनियन स्थापन करण्यावरून वाद सुरू आहे. त्याचे पर्यवसन आज दगडफेकीत झालं. दोन गट समोरासमोर आले. मुंबई लेबर युनियनच्या बाजूने साठ टक्क्याहून अधिक कामगार उभे राहिले असून त्यांनी लेबर युनियनच्या नावाखाली नोंदणीही केलेली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन लेबर युनियनला थारा देत नसून इतर युनियनला सहकार्य करून मुंबई लेबर युनियनला कंपनीमध्ये शिरू देत नाही असा आरोप या युनियनच्या वतीने करण्यात येतोय. यावरूनच गेल्या दोन-चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती आणि आता या नाराजीते रुपांतर दगडफेक व मारहाणीत झाले.


आज झालेल्या या दगडफेकीत अनेक कामगार जखमी झाले आहेत. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सुमारे 300 पोलिसांचा फौजफाटा या कंपनीमध्ये पोहोचला. पोलिसांनी सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या दगडफेकीनंतर अजूनही कंपनी प्रशासनाची बाजू काय हे समजू शकलं नाही.   


ताजी माहिती


तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे. विराज प्रोफईल लि. या कारखान्यात मागील वर्ष भरापासून मुंबई लेबर युनियन व कंपनी व्यवस्थापनाने स्थापन केलेली युनियन यात मुंबई लेबर युनियनचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने स्थापन  केलेल्या युनियनचे सदस्य होण्यासाठी दबाव आणला जात होता. यातून अनेक वेळा संघर्ष ही झाला होता. परंतु आज ( शनिवारी) दुपारी कंपनी व्यवस्थापनाने मुंबई लेबर युनियनच्या कामगारांना जबरदस्तीने कंपनीच्या बाहेर काढून काही गावगुंडांच्या मदतीने कंत्राटी कामगारांची नेमणूक केल्याने संतप्त कामगार व जावळपास 150 बाऊँसर, 100 हून अधिक कामगार म्हणून आणलेले गावगुंड यांच्यात आज दुपारी तुफान हाणामारी व दगडफेक झाली. यात जवळपास 70 ते 80 कामगार व 16  पोलिस जखमी झाले आहेत. तर तीन कामगारांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारार्थ मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

 

मागील 30 ते 35 वर्षांपासून कामगारांची अर्थिक व मानसिक पिळवणूक करणाऱ्या विराज प्रोफाइल कारखान्यात व्यवस्थापन व कामगारांचा वाद शिगेला पोचला आहे. कंपनी व्यवस्थापनाने स्वतःची कामगार संघटना स्थापन करत मुंबई लेबर युनियनचे सदस्य असलेल्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाच्या युनियने सदसत्व घेण्यासाठी दबाव वाढवत कंपनीतून बाहेर काढल्याने सुरू झालेल्या वादातून पेटलेल्या संघर्षात कारखान्यात कामगारानी आक्रमक होत तुफान दगडफेक केली. या गंभीर घटनेत 70 ते 80 कामगारांना मारहाण करण्यात आली असुन या संघर्षादरम्यान १६ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे समजते. जखमी कामगार व पोलीसांवर बोइसर येथिल शासकीय रुग्णालयात व तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

या घटने नंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कंपनी आवारातील सीसीटीव्ही सह समोर आलेले व्हिडिओ तपासून या प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या: