मुंबई: बाकीच्या थापा मारणारे अनेक आहेत, पण चांगलं काम केल्यानंतर कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही, पण 14 तारखेला मी अनेकांचा मास्क काढणार आहे असंही ते म्हणाले. मुंबई पालिकेने 'सर्वांसाठी पाणी' हे नवे धोरण जाहीर केलं आहे. या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारख वाटत आहे. मी माईक समोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला काढणार आहे, कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही."


उद्धव ठाकरे म्हणाले की, "इलेक्ट्रिक बस चालवणारी मुंबई ही पहिली महापालिका आहे. सीबीएई आणि इतर बोर्ड आपण महापालिकेच्या शाळेत आणत आहोत. दिल्लीत ही गोष्ट असेल तर ते राज्य आहे, आपली महानगरपालिका ही गोष्ट राबवत असल्याने देशातील अशी पहिली महापालिका आहे."


आज विचारांच प्रदूषण झालं आहे असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबईची रचना ही समुद्र सपाटी पासून खाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असतं. आपण अनेक प्रयन्त केले आहेत, तरी पाणी तुबंत हे सारखं दाखवल जातं. हिंदमाता तुंबणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार.  बाकीचे थापा मारणारे खूप आहेत, कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत."


महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेने 'सर्वांसाठी पाणी' नवे धोरण जाहीर केलं आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना रोज समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातून अनेक विशेष तरतुदींची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी एक म्हणजे, 'सर्वांसाठी पाणी'.


महत्त्वाच्या बातम्या: