Palghar News : सर्व बाधितांचे पुनर्वसन करण्याआधीच पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील देहर्जे धरणाचे काम सुरु करण्यात आल्यानं प्रकल्पग्रस्त संतप्त झाले असून धरणाचे सुरु असलेले काम ठेकेदारानं न थांबविल्यास सामुहीक आत्मदहनाचा इशारा देहर्जे प्रकल्पबाधित संघर्ष समितीमार्फत प्रशासनाला देण्यात आला आहे.


वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांसाठी भविष्यातील पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन पाणी पुरवठा करण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील देहरजी नदीवर सुकसाळे येथे 3.37 टीएमसी क्षमतेच्या धरण प्रस्तावित आहे. या धरणाचे बांधकाम बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचे भूसंपादन आणि संपूर्ण पुनर्वसन यासाठी एकूण 1285.47 कोटी रुपयांच्या खर्चास 14 सप्टेंबर रोजी सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मागील 14 वर्षांपासून हा प्रकल्प रखडला असून धरणामुळे विक्रमगड तालुक्यातील बाधित होणार्‍या साखरे, खुडेद आणि जांभे या गावातील जवळपास 374 कुटुंबांचे योग्य जागेअभावी पुनर्वसन रखडले आहे.


विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे येथे देहरजी नदीवर बांधण्यात येत असलेल्या धरणाचे प्राथमिक काम तीन वर्षापूर्वी सुरु करण्यात आले होते. सुरुवातीला सिंचनासाठी आरक्षित असलेला हा प्रकल्प आता वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करण्यासाठी ठेव तत्वावर आरक्षित केल्याने या प्रकल्पाविरोधात स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून या धरणाविरोधात प्रकल्पबाधित आणि स्थानिक लोकांकडून सतत आंदोलने करून धरणाचे सुरु असलेले काम बंद पाडण्यात येत आहे. या धरणासाठी 234 हेक्टर खाजगी तसेच 445 हेक्टर वन जमीन अशी एकूण 680 हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार असून साखरे, जांभे आणि खुडेद या गावातील 4 पाड्यातील जवळपास 374 कुटुंबं विस्थापीत होणार आहेत. आधी संपादीत जमीन आणि घरांचा योग्य मोबदला आणि संपूर्ण पुनर्वसन आणि नंतरच विस्थापन ही बुडीत क्षेत्रातील बाधीतांची मागणी असून मोबदला आणि पुनर्वसन करण्याच्या अगोदरच कंत्राटदाराने धरणाचे प्राथमिक काम सुरु केल्यानं देहरजी धरणाला विरोध अधिकच वाढू लागला आहे.


धरणामुळे बाधित होणार्‍या 374 कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक घरे आणि शेत जमीन जवळपास असेल अशा योग्य आणि बाधितांना मान्य होईल, अशा जमिनीचा गेल्या तीन वर्षांपासून  पालघर पाटबंधारे बांधकाम विभाग सूर्यानगर बांधकाम विभाग आणि भूसंपादन आणि पुनर्वसन अधिकारी पालघर यांच्या अधिकार्‍यांकडून विक्रमगड आणि वाडा तालुक्यात शोध सुरु आहे. मात्र सरकारी अधिकार्‍यांच्या उदासीन धोरणामुळे अजूनही पुनर्वसनासाठी आवश्यक योग्य जागा मिळत नसल्यानं प्रकल्पबाधित मेटाकुटीला आले आहेत. त्यातच धरणाच्या कंत्राटदारानं पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरत पुन्हा एकदा धरणाच्या जागेवर मोठमोठ्या मशीनरी आणून काम सुरु केल्यानं प्रकल्पबाधित संतप्त झाले असून धरणाचे सुरु केलेले काम तातडीने थांबवून भूसंपादन मोबदला आणि संपूर्ण पुनर्वसन याबाबत लिखीत आश्वासन द्यावे, अन्यथा देहर्जे प्रकल्पबाधित संघर्ष समिती यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व प्रकल्पबाधित यांनी धरणाच्या जागेवर काम बंद आणि आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.