मुंबई :   राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरत आहे, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून विविध निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.  आता राज्यभरातील बंदिस्त सभागृह, चित्रपटगृहे, नाट्यगृहे हे देखील पुन्हा सुरू होत असून, याबाबतची कार्यपद्धती व नियमांचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे. याशिवाय, बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना देखील नियंत्रित स्वरूपात सुरू करण्यास परवानगी 22 ऑक्टोबर पासून देण्यात आलेली आहे.मात्र 15 ऑक्टोबरला मुंबईत हॉलमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हे नियम लागू नाही का असा सवाल नियमावली जाहीर झाल्यानंतर उपस्थित होतोय.


  शिवसैनिकांसाठी (Shiv sena) म्हत्वाचा दिवस म्हणजे दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची (shiv sena dasara melava) जागा निश्चित झालीय. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. गेल्या वर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात संपन्न झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात पार पडणार आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये 50 टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे शासनाने 22 ऑक्टोंबर पासून सभागृहात व नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र दुसरीकडे सत्तेत असलेल्या पक्षाकडून  नियम लागू होण्याअगोदरच पायदळी तुडवले जाण्याची शक्यता आहे. 



  मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बंदिस्त सभागृह, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबर 2021 नंतर आरोग्याचे नियम पाळून खुले करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा 25 सप्टेंबर 2021 रोजी केलेली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नमूद केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अधीन नाट्यगृहे नियंत्रित पध्दतीने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. ही परवानगी देणयामागील शासनाचा हेतू विचारात घेऊन सर्व संबंधितांनी नाट्यगृहांचे परिचालान कोरोना संदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधांचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 



मात्र यावर्षी शिवसेनेचा 15 ऑक्टोबरला दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात होणार आहे,  50% उपस्थितीत सभागृहात पदाधिकारी व नेते उपस्थित राहतील असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होणार नाही का असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहिलं की सभा संमेलनाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि नियमांचं उल्लंघन होत आहे. मात्र त्या ठिकाणी कारवाई न करता सर्वसामान्यांवर सर्रासपणे प्रशासन कारवाई करतं. मग सभा-संमेलनावर कारवाई का नाही असा सवाल देखील सर्वसामान्य उपस्थित करत आहे. त्यात आता दसरा मेळावा होणार आहे या देखील नियमांचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.