Palghar News Updates :  पालघर जिल्ह्याच्या (Palghar Health Issue) मर्कटवाडीत वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे दोन जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानात पालघर जिल्ह्यातून आणखी एक घटना समोर आली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील पाचघर गावामध्ये रस्ता नसल्यामुळे एका गरोदर महिलेला नरक यातना भोगाव्या लागल्यात. 16 ऑगस्ट रोजी या महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना त्यांचं वाहन चिखलात रुतलं होतं. अखेर ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करुन ही वाहनं बाहेर काढलं. मात्र, समस्या इथेच संपली नाही. पुढे ग्रामीण रुग्णालयात सुविधा नसल्यानंही महिलेची मोठी परवड झाली. 


महिलेला घेऊन नातेवाईक परळी आरोग्य केंद्र आणि त्यानंतर वाडा ग्रामीण रूग्णालयात दाखल झाले. मात्र, या दोन्ही ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेला ठाण्यातील दवाखान्यात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे प्राण कंठाशी आले असतानही नातेवाईकांनी या महिलेला ठाण्यातील रुग्णालायत दाखल केलं. सध्या या महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण पसरलं आहे. 


प्रसूतीच्या कळा सोसत 80 किलोमीटर प्रवास


प्रसूतीच्या कळा सोसत 80 किलोमीटर रुग्णालय गाठण्यास निघालेल्या महिलेची हेळसांड झाल्याचं या घटनेतून समोर आलं. वाडा तालुक्यातील पाचघर गावातील महिलेनं प्रसुतीसाठी खासगी जीपमधून रुग्णालयात नेताना पक्का रस्ता नसल्याने या महिलेचे अतोनात हाल झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने या महिलेची ठाणे येथे सुखरूप प्रसूती झाली असली तरी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचे हे भयान वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. वाडा तालुक्यातल्या पाचघर गावातील गर्भवती महिलेस 16 ऑगस्टला प्रसूती कळा येऊ लागल्याने तेथील असलेल्या आशा सेविकेने तत्काळ गावातील जीप घेतली अन् परळी येथील प्राथमिक केंद्रात जाण्यासाठी निघाले.


परळी ते खोडाळा या मुख्य रस्त्यापासून हे गाव 5 किलोमीटरवर असून काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आणि बिकट झाली आहे. रूग्णालयात निघालेली ही जीप अक्षरशः चिखलात रुतल्याने ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी रुतलेली जीप बाहेर काढून महिलेला परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवले. 


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे साजरा होत असताना दुसरीकडे करोडो रुपये निधी खर्चून  रस्त्यांची दुरवस्था मात्र कायम असल्याने येथील ग्रामस्थांमधे असंतोष निर्माण झाला आहे. त्यानंतरही परळी आरोग्य केंद्र आणि वाडा ग्रामीण रूग्णालय यांनी महिलेला चक्क ठाणे येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. अखेर या महिलेची ठाणे येथे प्रसूती झाली. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या


Palghar News : दवाखाना गाठण्यासाठी गर्भवतीची डोलीतून पायपीट, आरोग्य सेवा न मिळाल्याने जुळ्या बाळांचा मृत्यू


पालघरमधील जुळ्या बालकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची हायकोर्टाकडून दखल


Maharashtra Monsoon Assembly Session : पालघरमध्ये सुविधांअभावी जुळ्या बाळांचा मृत्यू, अजित पवारांचे सरकारला खडेबोल