पालघर : जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांडाला आज (शुक्रवारी) एक वर्ष पूर्ण होतंय. त्यामुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्यात. मुल पळवणारी टोळी गावात दाखल झाल्याच्या संशयावरून प्रक्षुब्ध जमावानं तिन साधूंची अमानुष मारहाण करत हत्या केली होती. मात्र या वर्षभरात या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्यात. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्टेट सीआयडीनं याप्रकरणी 126 आरोपींविरोधात 4995 पानांचं पहिलं तर 5921 पानांचं पुरवणी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. राज्य सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेत या घटनेनंतर 165 संशयिंताना अटक करण्यात आली आहे. तर कासा पोलीस स्थानकांतील दोन पोलिसांना निलंबितही करण्यात आलं आहे. तसेच या घटनेची शिक्षा म्हणून पालघरचे एसपी गौरव सिंह यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होतं. 


तसेच याप्रकरणी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही कारवाई सुरु केली होती. मात्र निर्धारीत वेळेत गोस्वामी यांच्याविरोधात तपासयंत्रणेनं याप्रकरणी कोणतीच कारावाई न केल्यानं कोर्टानं नुकतीच याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील चॅप्टर केस बंद करत कारवाई रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.


या घटनेच्या वर्षपूर्ती निमित्त भाजप तसेच काही हिंदुत्ववादी संघटना काही ठिकाणी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मुंबईत भाजप आमदार राम कदम हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासमोर जाऊन आंदोलन करणार आहेत. मुंबई पोलिसांनी मात्र राम कदम यांना या आंदोलनासाठी परवानगी नाकारत तशी नोटीसही बजावली आहे. तर नाशिकहून भाजप अध्यात्मिक आघडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी मागील एक वर्षात त्या भागात मुलांच्या अपहरणाची एकही घटना घडली नसल्याचं माहितीच्या अधिकारात उघडकीस आल्याचा दावा केलाय. या हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण होत असल्यानं आचार्य तुषार भोसले शुक्रवारी पालघरच्या गडचिंचले गावात जाऊन त्या साधूंना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. तसेच सर्व नागरिकांनी सूर्यास्ताच्या वेळी घरीच एक दिवा लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी असं अवाहनही केलं आहे.


काय घडली होती घटना?


पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून चोर समजून तिन सांधूंची ठेचून हत्या करण्यात आली. गुजरातमधील सुरत इथं एका अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि वाहन चालकाचा या हत्याकांडात जीव गेला. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी जमावाकडून पीडितांना वाचविण्यासाठी कोणतेही सहकार्य अथवा मदत केली नाही. या घटनेच्या एका व्हिडीओमध्ये पोलीस अधिकाऱ्यानं पीडित साधूचे जमावापासून संरक्षण करण्याऐवजी स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Palghar Mob Lynching Case | पालघर गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणाला एक वर्ष पूर्ण