पालघर : देशाला हादरवून सोडणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणाला 16 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.  सध्याही या प्रकरणावरून सरकार आणि विरोधक यांच्यात सातत्याने खटके उडत असून ह्या प्रकरणाची आग अजूनही धगधगतीच आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे एका जिल्ह्यातून किंवा राज्यातून अति तातडीचा प्रवास मिळेल त्या मार्गाने रात्री-अपरात्री प्रवास नागरिक करत होते.  अशाच एका प्रकरणातून गडचिंचले साधू हत्याकांड  सारखी दुर्घटना घडली. काही समाजकंटकांनी ग्रामीण भागात चोर येतात ,दरोडेखोर येतात, लहान मुलांना पळवून नेतात, किडन्या काढतात अशा एक ना अनेक अफवा पसरवल्या.  त्यामुळे अंधार झाला की गावागावातून नागरिक रस्त्यावर यायचे आणि येईल त्याला पकडून मारझोड करायची थोडीशी ओळख पटली तर सोडून द्यायचे.  पोलीस सोडवायला गेले की पोलिसांवरही हल्ला करायचे असा कायदा हातात घेण्याचे काम काही समाजकंटक करताना दिसत होते. यातूनच पालघर जिल्ह्यात दोन चार घटना घडल्या मात्र गडचिंचले येथे घडलेला प्रकार देशाला हादरवून सोडणारा होता. 


 पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे गुजरातकडे चालले होते. पण, गुजरातची सीमा बंद असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे ही गाडी 15 मिनिटाने मागे आली. गाडी जशी मागे आली तेव्हा तिथे अचानक लोकं जमा झाले. जवळपास हजार लोकं होती. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. काही कळायच्या आत लोकांनी या तिघांना मारहाण सुरू केली.
          
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले हे गाव दादरा-नगर- हवेली या केंद्र शासित प्रदेशाच्या सीमेवर वसलेले आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गडचिंचले गावात 1298 रहिवासी असून त्यापैकी 93 टक्के लोक अनुसूचित जमाती किंवा आदिवासींचे आहेत. गडचिंचले गाव पालघर जिल्हा पोलिसांच्या कासा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येते.  घटनेच्या काही दिवस आधी या सर्व आदिवासी भवन परिसरात  दरोडेखोर गावात विशेषत: मुलांचे मूत्रपिंड चोरुन काळाबाजारात विकण्यासाठी नेत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात निर्बंध घालण्यात आले होते.  16 एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली तेव्हा साधू हे त्यांचे गुरु महंत राम गिरी यांच्या अंत्यदर्शनासाठी गुजरातच्या सुरतला जात होते. त्यावेळी गावात चोर दरोडेखोर आल्याच्या संशयातून पाचशेहून अधिक नागरिकांच्या जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांचे निर्घृण हत्या केली.


 भाजपाशी तीन दशक जुने संबंध तोडून आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी संबंधित वैचारिकदृष्ट्या भिन्न-राजकीय पक्षांशी हातमिळवणी केल्यापासून चार महिन्यांहून अधिक काळानंतर उद्धव ठाकरे यांच्या हिंदूत्वावर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावर हे प्रकरण भडकले. त्यानंतर कासा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास राज्य सीआयडीमार्फत करण्यात आला. या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी व 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच 35  कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 7 मे रोजी गडचिंचले येथे घटनास्थळाचा दौरा केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. 


गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केले असून हा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे हे विशेष सरकारी वकील आहेत तर अमृत अधिकारी आणि अतुल पाटील हे आरोपींचे प्रतिनिधित्व करत आहेत. 
        
दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गडचिंचले येथे तिघांची हत्या केली. या प्रकरणात जवळपास 500 च्या वर संशयिताना सीआईडी ने ताब्यात घेतले होते पैकी  13 अल्पवयीन मुलांसह 251 आरोपींना अटक केली होती. सध्या या पैकी काहीना जामीन मंजूर झाला असून 70 पेक्षा जास्त अजूनही अटक आहेत


पालघर जिल्ह्यतील गडचिंचले गावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेनं 12 हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात 250 हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. 'लोक अफवेला बळी पडल्यामुळं हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 


एप्रिल महिन्याच्या 16 तारखेला गडचिंचले गावात जमावानं दरोडेखोर समजून दोन साधूंसह त्यांच्या ड्रायव्हरची लाठ्याकाठ्या व दगडानं ठेचून निर्घृण हत्या केली होती. या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न झाला होता. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणीही करण्यात आली होती. राज्य सरकारनं गुन्हे शाखेकडं प्रकरणाचा तपास सोपवला होता.या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे.सध्याही हे प्रकरण धगधगतच असून 16 एप्रिलला या घटनास्थळी येउन श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होणार असल्याची चर्चा आहे