पालघर : पालघर जिल्ह्याची कोरोना संक्रमण स्थिती गंभीर बनली असून शहरी भागाबरोबर ग्रामीणची स्थितीही चिंताजनक बनली आहे. तर जिल्ह्यातील पोलीस,आरोग्य कर्मचारी आणि कैदेत असलेल्या आरोपीही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गडचिंचले साधू हत्याकांडातील 11 आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचं काल समजल्यानंतर आज आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वाडा पोलीस ठाण्याच्या कैदेत असलेल्या 17 पैकी 16 आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. तर खानिवली आरोग्य केंद्रातील 7 कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे वाडा पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालयाचा परिसर आणि खानिवली आरोग्य केंद्राचा परिसर सील करण्यात आला आहे.


जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 47 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यामध्ये 12 महिला आणि 35 पुरुषांचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडातील एकूण 16 आरोपींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासना बरोबर जिल्हा प्रशासनही खडबडून जाग झालं आहे. सध्या न्यायालयाच्या परवानगीने या सर्वांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.


पालघर ग्रामीण तालुका निहाय रुग्ण संख्या - डहाणू 1, जव्हार 14, वाडा 27, मोखाडा 2, वसई 2, विक्रमगड 1


सध्या पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2065 वर पोहोचला असून आतापर्यंत 71 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,तर पालघर ग्रामीणचा आकडाही 481 वर पोहोचला असून आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात 937 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1060 बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.