पालघर : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा भासत आहे. अशातच पालघरमधील वाडा येथे राहणारे प्राध्यापक किरण थोरात हे सध्या कोविड रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. पालघर, ठाणे, मुंबईसह नाशिक, पुण्यातील अनेक रुग्णांना प्लाझ्मा आणि रक्त उपलब्ध करून देणाऱ्या किरण थोरात यांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
पालघर दांडेकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करणारे किरण थोरात, गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अनेक तरुण हे त्यांच्याकडे खेळाच्या प्रशिक्षणासाठी येत असतात. यातून त्यांनी वेगवेगळ्या रक्तदात्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. या माध्यमातून जवळपास 25 हजार जण जोडले गेले आहेत. त्यातून पालघर-ठाणे मुंबईसह राज्यात इतरत्र लागणाऱ्या रक्ताचा पुरवठा किरण थोरात हे करत असतात. कोरोना काळात राज्यासह देशात आणि ग्रामीण भागात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज लागते. हा तुटवडा भरून काढण्यासाठी किरण थोरात हे दिवस-रात्र काम करत आहेत. किरण थोरात यांनी आपल्या वयाच्या 18व्या वर्षापासून स्वतः रक्तदानाला सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 89 वेळा रक्तदान केले आहे. किरण थोरात यांनी कोविड काळात 16 रक्तदान शिबीरं घेतली. तर जवळपास तीनशे रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले आहे. या वर्षभराच्या कालावधीत जवळपास सहाशे रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे किरण थोरात यांनी अनेकांचा जीव वाचवला आहे.
किरण थोरात यांचे वडील हे रुग्ण सेवा करत होते. त्यांच्याच प्रेरणेतून किरण थोरात यांनी रुग्णसेवा करण्याचा ध्यास घेतला. आपला वाढदिवस नेहमी रक्तदानाने साजरा करून त्यांनी एक वेगळा आदर्श ठेवला. कोरोना काळात अनेकांना प्लाझ्मा आणि रक्ताची गरज भासत असून किरण थोरात यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. रक्तदान आणि रक्त पुरवठा यासाठी महत्त्वाचं कार्य करत असल्याने किरण थोरात यांना 'रक्तकर्ण' म्हणूनही गौरवण्यात आले आहे. किरण थोरात यांचा आदर्श ठेवून अनेक तरुण आज रक्तदान करत आहेत. त्यामुळे किरण थोरात यांच्या मित्रांनाही त्यांचा अभिमान आहे.
कसं चालतं काम?
व्हाट्सअप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर किरण थोरात यांनी ग्रुप तयार केले आहेत. त्यातून ते पालघरसह राज्यातील इतर जिल्ह्यांच्या संपर्कात आहेत. ज्या ठिकाणी रुग्णांना रक्ताची किंवा प्लाझ्माची गरज भासते, ते रुग्ण किरण थोरात यांना संपर्क करतात. त्यानंतर किरण थोरात हे रुग्णाच्या जवळ राहणाऱ्या रक्तदात्यांचा संपर्क देऊन त्यांच्याकडून रक्तदान करून घेतात. या पद्धतीने किरण थोरात यांनी अनेकांचे जीव वाचवले असून त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरु आहे. ग्रामीण भागात प्लाझ्मा आणि रक्तदानाबाबत अनेक शंका आणि संभ्रम असून मनात कोणतीही भीती न बाळगता तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन किरण थोरात यांनी तरुण पिढीला केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :