जळगाव : विवाह करून आलेल्या सुनेचे गृहप्रवेश करताना ज्याप्रमाणे सासरी लक्ष्मीचं रुप म्हणून दारात माप ओलांडून स्वागत केले जाते त्याच पद्धतीने कोरोनातून मुक्त होऊन परतलेल्या नवजात बालिकेचे माप ओलांडून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात तिच्या कुटुंबानं स्वागत केल्याचं जळगावात पाहायला मिळालं आहे. 


जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात योगेश चौधरी यांच्या पत्नी नऊ महिन्यांच्या गर्भवती असतानाच त्यांना कोरोना ची बाधा झाल्याचं सामोरं आले होते, प्रसूतीच्या तारखेच्या अगदी जवळ असताना ही बाधा झाल्याने संपूर्ण परिवारावर चिंतेच सावट पसरलं होतं. अशातच अंशू चौधरी यांची प्रसूती होऊन त्यांनी कन्येला जन्म दिला, जन्मलेल्या बालिकेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. 


चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चौधरी कुटुंबाची चिंता अधिकच वाढली होती. अंशू चौधरी यांना कोरोनाचा फारसा त्रास जाणवला नसला तरी त्यांच्या नवजात बालिकेला मात्र ऑक्सिजन लावण्याची वेळ आली होती. तिची प्रकृती गंभीर असल्याने ती यातून बाहेर पडेल किंवा नाही या बाबत डॉक्टर आणि कुटुंबीयांनाही शंका होती. मात्र डॉक्टरांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि चौधरी कुटुंबीयांनी आपला आशावाद सोडला नाही, अशी परिस्थती असताना नवजात बालिकेने डॉक्टर करीत असलेल्या उपचाराला चांगलं प्रतिसाद दिल्याने तिच्यात झपाट्याने सुधारणा होत असल्याचं दिसून आलं होतं. मात्र तरीही सत्तावीस दिवस जीवन-मरणाशी संघर्ष करीत ही बालिका पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने तिला आता घरी सोडण्यात आलं आहे.


Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण


चौधरी परिवारात पहिलीच मुलगी जन्माला आली असल्याने आणि तिसुद्धा जगण्याचा संघर्ष यशस्वीरित्या पार पाडून आल्यामुळं चौधरी कुटुंबीय आनंदात होते. याच आनंदात लक्ष्मीच्या रुपात आपली मुलगी घरात पहिल्यांदा येत असल्याने चौधरी कुटुंबाने एखाद्या नववधूच्या गृह प्रवेशाप्रमाणं तिचं स्वागत केलं आहे.


चिमुरडीच्या स्वागतासाठी दारात तांदूळ भरलेले माप ठेऊन ते ओलांडण्यात आलं. शिवाय लक्ष्मीचं पाहिलं पाऊल म्हणून कुंकवाचे पाय उमटविण्यातही आले. अशा प्रकारे चौधरी परिवाराने कोरोना मुक्त बलिकेचं केलेलं स्वागत हे जळगावमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.