बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या या 22 जणांचा अखेरचा प्रसासही वेदनादायी होता. या संपूर्ण प्रकारामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
बीड जिल्हातील अंबोजोगाई कोरोनाचं हॉटस्पॉट ठरत आहे. अंबाजोगाईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही येथे जास्त आहे. त्यामुळेच प्रशासनही ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी होताना दिसत आहे. येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच रविवारी दुपारी 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी मृतदेह रुग्णवाहिकेत कसे ठेवले असतील याचा अंदाज बांधलेलचा बरा. रुग्णालय प्रशासनाच्या या असंवेदनशील कारभारावर टीका होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. मात्र सध्याच्या घडीला दोन रुग्णवाहिका पुरेशा नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्वारातीला पाच रूग्णवाहिका देण्यात आल्या होत्या, सध्या दोन आहेत. वाढीव रूग्णवाहिकांसाठी आम्ही 17 मार्चला जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप रूग्णवाहिका मिळाल्या नाहीत, असं स्वाराती रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.
काल नेमके काय झाले?
दैनिक विवेकसिंधूचे मालक, संपादक बाळू गाठाळ हे काल दुपारी अडीचच्या सुमारास स्वाराती रुग्णालय येथे गेले होते. त्याठिकाणी एका रुग्णवाहिकेत 22 आणि दुसऱ्या रुग्णवाहिकेत सहा मृतदेह ठेवले होते. साडे चारला अंत्यविधी सुरू झाले. बाळू स्वत: तिथे तीन तास उपस्थित होते. मयतांचे काही नातेवाईकही तेथे उपस्थित होते. नातेवाईक दुखात असल्याने त्यांचं लक्ष याठिकाणी गेलं नसावं. आजही 10 मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.