पालघर : पालघर जिल्हा ओल्या दुष्काळाच्या छायेत गुरफटला असून, या जिल्हयातील बळीराजा आणि मच्छीमार हतबल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने 90 टक्के शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केलेच होते. मात्र आत्ता ‘महा’ चक्रीवादळाच्या परिणामाने पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे पूर्ण कंबरडच मोडून काढल आहे.

एकीकडे सरकार बनविण्याचे चाळे सुरू असताना शेतकरी मात्र रडकुंडीला आला आहे. सरकार कडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश जरी दिले असले तरीही हे काम धीम्या गतीने सुरू आहे. नुकसान भरपाई किंवा संपूर्ण कर्ज माफीची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.त्यामुळे बळीराजा अडचणीत आहे. तर दुसरीकडे मच्छीमारही मोठ्या संकटात आहे. समुद्रात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मच्छीमारीला खीळ बसली आहे.त्यामुळे माशांची आवकच पूर्णपणे बंद झाली आहे.

रात्री उशिरा पालघर जिल्ह्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली असून या पावसामुळे भात शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . पालघर जिल्ह्यातील डहाणू , तलासरी, वाडा, विक्रमगड , पालघर , मोखाडा, जव्हार या भागात रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील 75 हजार हेक्टवरवर असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भात पीक पूर्णपणे तयार झालं असून सध्या जिल्ह्यात भात कापणीची शेतकऱ्यांनी काम सुरू केली आहेत.

महा चक्रीवादळाच्या परिणामाने अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतात वाळत टाकलेला भात पाण्यात पूर्णपणे नष्ट झाले त्यामुळे पालघर जिल्ह्यातील बळीराजा हताश झाला आहे .तर गेल्या कित्येक दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झालं असून अजूनही काही भागात शासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे केले जात नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम किनारपट्टी भागातील मच्छीमार ही संकटात असून नैसर्गिक आपत्तीमुळे 2477 बोटी पूर्णपणे बंद असल्याने मच्छीमारी ठप्प आहे त्यामुळे मच्छीमार ही संकटात सापडला आहे.