पंढरपूर : काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन राम जन्मभूमी आणि सावरकरांबद्दलची भूमिका शिवसेनेला सोडता येईल का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी सेनेला केला आहे. अप्रत्यक्षपणे आमच्याशिवाय पर्याय नसल्याचे सेनेला सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ही टेंपररी फेज आहे, लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटेल, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रपती राजवटीची शक्यता त्यांनी फेटाळली. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस उलटले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. जर आज (8 नोव्हेंबर) काही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कालवधी वाढवून देऊ शकतात किंवा मग राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील शेतकरी आणि जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मंत्री पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

सांगली जिल्ह्यातील दाम्पत्याला मिळाला मान.
चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सांगली जिल्ह्यातील (रा.मल्लेवाडी ता.मिरज)शेतकरी सुनिल महादेव ओमासे आणि पत्नी नंदा यांना कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला. मागील 16 वर्षांपासून ते नियमित वारीला येतात.

कार्तिकी निमित्त ५ टन फुलानी सजली विठुरायाची राउळी
कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यानी ३० प्रकारची देशी-विदेशी ५ टन फुले यासाठी वापरली. या आकर्षक सुगंधी फुल सजावटीमुळे विठ्ठल मंदिराचे रुपडेच बदलुन गेले आहे.