Kirit Somaiya : परिवहन मंत्री अनिल परब यांचा अनाधिकृत रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून भाजप नेते किरीत सोमय्या चांगलेच आक्रमक झाले आहे. मंत्री परब यांचा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून काल सोमय्या दापोलीत दाखल झाले होते. मात्र, यावेळी किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळं काल दिवसभर राजकीय नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. उशीरा रात्री पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यानंतर आज किरीट सोमय्या नेमकी काय भूमिका घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई होणार
पोलिसांनी किरीट सोमय्या यांनी अटक केली, त्यानंतर त्यांची सुटकाही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी पुढच्या आठवड्यात आणखी तिघांवर कारवाईचा इशारा सोमय्यांनी दिला आहे. दरम्यान, दापोलीतल्या रिसॉर्टकडे निघालेल्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. त्यानंतर भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे काल दापोलीत दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी दापोली पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही आणि रिसॉर्टकडेही जाऊ दिलं नाही. त्यामुळं सोमय्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. मात्र त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही. शेवटी सोमय्या आणि निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चालत परबांच्या कथित रिसॉर्टकडे निघाले. थोडे दूर गेल्यावर पोलिसांनी सोमय्या आणि राणेंना अडवलं. तेव्हा पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळाला. पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्स ओलांडून जाण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्ते करत होते. त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. शेवटी कायदा आणि सुव्यवस्था भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किरीट सोमय्या, निलेश राणे आणि निल सोमय्या यांना अटक केली. त्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय.
दापोलीतल्या रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे. शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे असल्याचा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र, शिवसेनेकडूनही किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे रिसॉर्ट माझं नाही असे सांगत आहेत. याबाबत ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. असेही परब म्हणाले. तसेच किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत. ते वातावरण खराब करत आहेत. मी पुन्हा याबाबत आता हायकोर्टात जाणार आहे. कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम ते करत आहेत. म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार, असा इशाराही परबांनी दिला आहे. तसेच किरीट सोमय्या रिसॉर्ट तोडायला कर्मचारी आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. हिंमत असेल तर तोडून दाखवा, असे खुले आव्हान देखील परब यांनी सोमय्यांना दिले आहे.