मुंबई : आपल्या गावाला आदर्श बनवल्यानंतर अशी अनेक गावं निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या पोपटराव पवार यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पोपटराव पवार म्हटलं की हिवरेबाजार, ग्रामविकास, पाणीदार गाव, सक्षम गाव अशी अनेक विशेषणं आपल्या समोर येतात. मात्र या पोपटराव पवार यांची एक खासियत जी आजवर कधीही समोर आली नव्हती. ती म्हणजे पोपटराव पवार हे उत्तम क्रिकेटर होते. याबाबत त्यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात आपल्या क्रिकेटवेडाची माहिती दिली. एवढंच नाही तर भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा एक भन्नाट अनुभव देखील शेअर केला. माझा कट्ट्यावर बोलताना ते म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनी चहा प्यायला घरी बोलावलं तेव्हा खूप भारी वाटलं. यावेळी व्हाया क्रिकेटर ते आदर्श गाव सरपंच ते पद्मश्री असा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. माझ्यासारख्या सर्वसामान्य सरपंचाला सचिनने घरी बोलावलं हे मी माझं भाग्य समजतो. मी इथपर्यंत पोहोचलो त्यालाही क्रिकेटचं कारणीभूत असल्याचही पोपटराव पवार म्हणाले.

हिवरेबाजार गाव 'आदर्श' बनण्याची रंजक कथा, पोपटराव पवारांनी कशी केली सुरुवात


पोपटराव पवार म्हणाले की, लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. त्यामुळेच मी 12 सायन्स नंतर कॉमर्सला अॅडमिशन घेतलं. मी पदवीला असताना पुणे विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळायचो. त्यामुळे नगर जिल्ह्यात माझं मोठं नाव झालं होतं. याचाच फायदा मला गावात झाला. गावात काहीतरी बदल हवा म्हणून गावाने मला बिनविरोध सरपंच केलं. सरपंच झाल्यावर पहिले तीन महिने गावाकडे फिरकलोच नाय. मात्र, 26 जानेवारीला ग्रामसभेला गेलो आणि लोकांच्या समस्या ऐकून ठरवलं आता गाव सोडायचं नाय, असं सांगत राजकारणात यायला क्रिकेट कसं महत्त्वाचं ठरलं हे सांगितले. त्यामुळे क्रिकेट सुटलं याची खंत वाटत नाही. उलट आज जे काही आहे ते क्रिकेटमुळेच घडल्याचेही त्यांनी सांगितले.

पद्मश्री मिळाल्याचा आनंद पण...

जिंकल्यानंतर हवेत जायचं नाही आणि हरल्यानंतर नैराश्यग्रस्त व्हायचं नाही. पद्मश्री हा मोठा आनंद आहे. मात्र तो आनंद व्यक्त करायचा नाही. लोकांमधूनच तो आनंद व्यक्त झाला पाहिजे, असंही पोपटराव पवार म्हणाले.  पद्मश्री पुरस्कार लवकर मिळाला असंही वाटत नाही किंवा उशिरा मिळालं असंही म्हणायचं नाही, पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे, असं उत्तर पोपटराव पवार यांनी दिलं.