राफेल विमानाची एकूण खरेदी किंमत 58 हजार कोटी रुपये सांगितली जाते. मात्र गेल्या तीन वर्षात पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये एकूण 68 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. म्हणजेच राफेलच्या कथित किमतीपेक्षा दहा हजार कोटी रुपयांनी जास्त. पहिल्या दोनच वर्षात विमा घेणाऱ्या कंपन्यांनी या योजनेतून 15,795 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला. त्यामुळे पीक विमा योजना हा राफेलपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा घणाघात पी. साईनाथ यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला.
राफेल विमानाची खरेदी ही फक्त एकाच वेळी झाली. मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेत दरवर्षी 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा फायदा हा विमा कंपन्यांना होतो. 2016 साली केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी दहा-दहा हजार असे एकूण 20 हजार, 2017 मध्ये 22 हजार आणि 2018 मध्ये 26 हजार अशी चक्रवाढ दराने रक्कम मिळत गेली. ही स्कीमच स्कॅम आहे, अशा शब्दात पी साईनाथ यांनी टीका केली.
स्वामिनाथन आयोगातर्फे कृषी विकासाचा अहवाल सादर करुन आज 14 वर्षे झाली, पण इतक्या वर्षात एकाही सरकारने यावर सलग एक तास संसदेमध्ये चर्चासुद्धा केली नाही.
देशात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. मात्र शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही आता सरकारने देणं बंद केलं आहे. सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारी जाणीवपूर्वक लपवत असल्याचा आरोपही पी. साईनाथ यांनी केला.
कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर नाही. शेतीचे प्रश्न समजून घ्यायचे असतील, ते सोडवायचे असतील तर स्वामीनाथन आयोग पीक विमा योजना, शेतकरी आत्महत्या या विषयावर चर्चा करण्यासाठी किमान तीन आठवड्यांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.