पुणे : चंद्रावर जमीन खरेदीचं आश्वासन देत काही भामट्यांनी पुणेकर महिलेला गंडा घातला. राधिका दाते-वाईकर यांना 14 वर्षांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.


राधिकाबाईंनी 14 वर्षांपूर्वी थेट चंद्रावर जमीन घेतली! फक्त 50 हजार रुपये एकर दराने त्यांनी एक एकर जमीन खरेदी केली. लुनार फाऊंडेशनचे भामटे पण इतके तयार, की लेकांनी चंद्रावरचा सातबाराही राधिकाबाईंना पाठवला. खरेदी खत आणि नकाशाही त्यांना दाखवण्यात आला.

बाईंनी पैसे भरले आणि चंद्रावरच्या घराच्या स्वप्नात त्या रममाण झाल्या. दोन वर्षांनंतर त्यांनी कागदपत्रांवरील क्रमांकावर संपर्कही साधला, मात्र काहीच प्रतिक्रिया आली नाही.

राधिकाबाईंचा मुलगा अकरावीत गेल्यावर त्यांना शिक्षणासाठी पैशांची गरज भासली. त्यामुळे लुनार फाऊंडेशनला संपर्क साधून पैसे परत मागण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कालांतराने हे सगळं गंडीव फशीव असल्याचं समोर आलं.
पुणेकराला दिसलेल्या 'एलियन'ची PMO कडून दखल

आता आकाशातला चंद्र दाखवून भामट्यांनी हातोहात पाकीट मारल्याचं लक्षात आल्यानंतर वाईकर दाम्पत्य 14 वर्षांनी पोलिसात गेलं आहे.

खरं तर हा कॉमन सेन्सचा भाग आहे. चंद्र म्हणजे मुळशी किंवा गुंठेवारीचा प्लॉट नव्हे. तो पृथ्वीपासून जितके किलोमीटर दूर आहे, तितके रुपये मोजूनही त्यावर हक्क सांगता येत नाही. पण आपल्या कवीवर्यांनी चंद्राला इतकं महत्त्व दिलं आहे, की लोकांची डोकीच बाद झाली आहेत.