Lumpy Skin Disease : देशातील विविध राज्यात जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातही 32 जिल्ह्यातील 3 हजार 30 गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आत्तापर्यंत राज्यात 93 हजार 166 पशुधन उपचाराने लम्पी रोगमुक्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांनी दिली. बाधित पशुधनावर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लाख लस उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, त्यातील एकूण 135.58 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आलं आहे.


या जिल्ह्यात लसीकरण पूर्ण


लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळं राज्यातील पशुपालक चिंतेत आहे. याचा दूध व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. वाढत्या लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करुन घेतलेले लसीकरण यांची आकडेवारीनुसार सुमारे 97 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे. बाधित गावांतील एकूण 1 लाख 43 हजार 89 बाधित पशुधनापैकी एकूण 93 हजार 166 पशुधन उपचारानं रोगमुक्त झाल्याची माहिती देखील आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.


शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार करावेत


महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा अवलंब करुन राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरुपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खासगी पशुवैद्यकांनी दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावेत असे आवाहन यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी केलं. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावं अशा सचूना देखील त्यांनी केल्या. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळं सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावं.


राज्यातील जवळपास 32 जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. याचा दूध उत्पादनावर देखील परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळं पशुसंवर्ध विभागाकडून लसीकरण सुरु आहे. दरम्यान, राजस्थान आणि गुजरात राज्यात लम्पी स्कीन आजारांन थैमान घातलं आहे. सगळ्यात जास्त फटका या दोन राज्यांना बसला आहे. तिथेही दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई : पशुसंवर्धन आयुक्त