उस्मानाबाद : फेसबुकवर ओळख झालेल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटणासाठी निघालेला उस्मानाबादचा झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला आहे. उस्मानाबाद पोलिसांचं एक पथक झिशानला घेऊन दाखल झालं. फेसबुकवर पाकिस्तानची मुलगी सामराच्या संपर्कात आला होता. तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला भेटण्यासाठी 11 जुलैला सकाळी 10 वाजता घर सोडून सायकलवर अहमदनगर व तेथून मोटार सायकलने गुजरात स्थित कच्छच्या भारत पाक सीमेपर्यंत पोहोचला होता. त्या दोघांमध्ये प्रेम कसं झालं? या प्रेमाच्या वेडात कशा प्रकारे तो बॉर्डरपर्यंत पोहोचला याबाबत त्याने एबीपी माझाला माहिती दिली.

कुमकुम भाग्यमुळे ती आयुष्यात आली

एबीपी माझाशी बोलताना झिशान म्हणाला की, 2015 मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यावेळी मी नव्याने फेसबुकवर आलो होतो. त्यावेळी मी टिव्हीवर कुमकुम भाग्य नावाची मालिका पाहायचो. ही मालिका मला आवडायची. मी फेसबुकवर या सिरियलविषयी पोस्ट करायचो. त्या मुलीलाही ती मालिका आवडायची. एका ग्रुपवर आमची ओळख झाली. हळूहळू आमच्यात संवाद सुरु झाला. मी तिला फ्रेंड रिक्वेष्ट पाठवली. मग आमच्यात चॅटिंग सुरु झाली. मी तिला सात-आठ महिन्यानंतर मी तिला प्रपोज केले. तीन चार दिवसांनी तिनं प्रपोजल स्वीकारलं, असं झिशान म्हणाला.

मग झालं ब्रेकअप...

झिशान म्हणाला की, तिनं मला सांगितलं की, आपलं नातं चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारे टिकवायचं आहे. त्यामुळं तिनं तिच्या घरी आमच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. माझ्याबद्दल तिनं तिच्या घरी सांगितल्यानंतर तिने मलाही माझ्या घरी तिच्याबद्दल सांगावं असं सांगितलं होतं. मात्र मी त्यावेळी सांगितलं नाही. यावरुन आमच्यात जरा भांडणं झाली. 2017 मध्ये यावरुन आमच्यात ब्रेकअप झालं. त्यानंतर आमच्यातला संवाद कमी झाला, असं झिशाननं सांगितलं. मात्र पुन्हा नंतर आमच्यामध्ये पुन्हा संवाद सुरु झाला. जानेवारी 2020 पासून आम्ही बोलू लागलो. माझ्याकडे तिचा नंबरही होता. त्यावरुन आमचं बोलणं व्हायचं. मात्र तिचं म्हणणं होतं की आपण फक्त मित्र म्हणूनच बोलुयात. मात्र पुन्हा आमच्यात प्रेम बहरायला सुरुवात झाली, असं झिशाननं माझाशी बोलताना सांगितलं.

कायदेशीर मार्गानेच जाण्याचा विचार होता, पण...

झिशाननं माझाशी बोलताना सांगितलं की, मी तिला भेटायला कायदेशीर मार्गानेच जाण्याचा विचार करत होतो. मी बेकायदेशीर मार्गाचा विचारही केला नव्हता. मार्च महिन्यात मी पाकिस्तानला जाण्याचा विचार केला. माझ्याकडे पासपोर्ट नाही, पासपोर्ट बनवण्यासाठी मी प्रयत्नही केले. मात्र कोरोनामुळं पासपोर्ट बनवायला अडचणी येत होत्या. मग मी म्हटलं की, काही काळ अजून वाट पाहावी. सर्व इंटरनॅशनल ट्रॅव्हल बंद झालं होतं. मी विचार केला की, लॉकडाऊन संपेल.मात्र लॉकडाऊन वाढत चालल्यानं माझ्या मनावर ताण वाढत चालला होता.

म्हणून मी लवकर निघालो..

तो म्हणाला की, त्या मुलीचं लग्न जमलं असल्याचं तिनं मला सांगितलं. लवकर लग्न होणार असल्याचं तिनं सांगितलं. मी तिथं जाऊन लगेच तिचे आईवडिल मान्य करणार नव्हते. मला तिथं जाऊन थोडं काम करावं लागणार होतं. त्यामुळं मी लवकर निघण्याचा निर्णय घेतला. त्यात हा कोरोना व्हायरस संपण्याचं नाव घेत नव्हता, त्यामुळं मला असं घरातून निघावं लागलं, असं झिशाननं माझाशी बोलताना सांगितलं.



आता इतक्या लोकांना त्रास दिलाय. मला याचा आनंद नाही. या त्रासानं माझं प्रेम कमी होणार नाही. मात्र मला आता आधी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. माझ्या आईवडिलांनी खूप सहन केलंय. आता बेकायदेशीर असं काहीही करणार नाही, असं झिशाननं सांगितलं.

संबंधित बातम्या

प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघालेला 'उस्मानाबादचा पठ्ठ्या' अखेर घरी परतला


पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या 'त्या' तरुणाच्या प्रकरणाला वेगळे वळण


'असं' घरी सांगून 'तो' प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात!

UNCUT | प्रेमासाठी काहीही... पाकिस्तानला निघालेल्या तरुणाला कसं केलं ट्रेस?

भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात

हे ही वाचा- 

प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला मुंबईकर हमीद सहा वर्षांनी मायदेशी

हमीद अन्सारी सहा वर्षांनी पाकहून भारतात सुखरुप परत!

सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी