नवी दिल्ली : 2012 साली पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला हमीद अन्सारी अखेर भारतात सुखरुप परतला. सहा वर्षानंतर मायभूमीत त्याचं पहिलं पाऊल पडलं, तेव्हा कुटुंबियांनाही भावनांचा आवेग आवरता आला नाही. मुंबईच्या वर्सोव्यातला 27 वर्षांचा एक सॉफ्टवेअर इंजिनियर फेसबुकवरुन एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडतो, तिला भेटण्यासाठी देशांच्या सीमा पार करतो, पण तिथे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा त्याला पकडतात आणि हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबतात. अगदी तंतोतंत फिल्मी वाटावी अशी ही कहाणी हमीद अन्सारीच्या रुपाने प्रत्यक्षात घडली आहे.
पाकिस्तानात पकडला गेलेला एखादा भारतीय गुन्हेगार परत सुखरुप यावा ही तर ही अतिशय कठीण, दुर्मिळ गोष्ट. काही महिन्यांपूर्वी चंदू चव्हाण हा धुळ्याचाच जवान अशा पाकिस्तानातून सुखरुप परत आला होता. चंदू चव्हाणने नजरचुकीनं सीमा ओलांडली होती, पण हमीद अन्सारी आपल्या प्रेयसीला भेटण्याच्या आतुरतेने तिथे पोहचला होता. प्रेम आंधळं असतं, प्रेमाला देशाच्या सीमा नसतात या गोष्टी आपण कथा-कादंबऱ्यांमध्ये ऐकतो. पण हमीदच्या कहाणीत याचा प्रत्यक्षपणे प्रत्यय येतो. आपल्याला नवीन जॉब मिळालाय असं घरच्यांना सांगून तो सुरुवातीला अफगाणिस्तानात पोहोचला, तिथून नंतर तो बनावट ओळखपत्राच्या आधारे पाकिस्तानात पोहोचला.


हमीदला अफगाणिस्तानद्वारे पाकिस्तानात आणण्यात त्याच्या या कथित गर्लफ्रेण्डने मदत केली असंही म्हणतात. पाकिस्तानातल्या ज्या लॉजवर तो उतरला होता, त्याचीही व्यवस्था तिनेच केली होती. पण पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी बनावट पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली. हमीद हेरगिरीसाठीच पाकिस्तानात आल्याचा आरोप करत त्याच्यावर मिलिट्री कोर्टात गुन्हा दाखल झाला. 2015 साली कोर्टाने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. 15 डिसेंबरला ही शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची आज सुटका होत आहे.

तुरुंगवास तीन वर्षांचा असला तरी पाकिस्तानातच्या तावडीत त्याची सहा वर्षे गेली. 27 वर्षांचा कमावता मुलगा असा अचानक गायब झाल्यानंतरही घरचेही हवालदिल झाले. हमीदची आई फौजिया मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये उपप्राचार्य आहे. वडील बँकेत नोकरी करत होते. आपल्या मुलाला परत आणण्यासाठी या कुटुंबाला बरंच काही गमवावं लागलं. सारख्या दिल्ली वाऱ्या कराव्या लागत होत्या, या कायदेशीर प्रक्रियेसाठी पैसाही लागत होता. कुटुंबाने वर्सोव्यातलं घर विकलं. वडिलांना बँकेतली नोकरीही सोडावी लागली.

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता हमीद घरी परतत आहे. आज त्याच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर कुटुंबियांसमवेत इतरही अनेक लोक उपस्थित होते. दोन्ही देशात सलोख्याचे संबंध राहावेत यासाठी झटणारे काही कार्यकर्ते, पत्रकारही या घटनेला विशेष महत्त्व असल्याचं सांगत आहेत.

प्रेमाच्या शोधात गेलेला मुंबईचा हमीद पाकिस्तानी तुरुंगात !




हमीदची ती कथित गर्लफ्रेण्ड खरंच अस्तित्त्वात होती का ते बनावट अकांऊट होतं? तिनं खरंच प्रेमापोटी हमीदला पाकिस्तानात यायला मदत केली? जर हे प्रेम खरं असेल तर देशाच्या सीमा पार करणाऱ्या या प्रेमाची गाथा अनेक वर्षे गायली जाईल. सहा वर्षे पाकिस्तानात राहिलेला हमीद आपल्यासोबत अनेक अनुभव, गुपितंही घेऊन आला आहे. या प्रेमकहाणीचा खरा रंग हमीदच्या बोलण्यातूनच उलगडू शकेल. पण तोपर्यंत पाकिस्तानातला एक भारतीय कैदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सुखरुप मायदेशी आला ही घटनाही दिलासा देणारी आहे.