धुळे : पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटून आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान चंदू चव्हाण यांनी सैन्य दलातील त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. चंदू चव्हाण यांनी आपला राजीनामा डीएम रेजिमेंट कमान अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. पाकिस्तानातून सुटून आल्यापासून सैन्य दलात माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मला वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत या त्रासाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं चंदू चव्हाण यांनी सांगितलं आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे सैन्य दलात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भारतीय सेनेकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. चव्हाण हे दोषी आहेत, त्यांच्या विरोधात विविध गुन्ह्यांसाठी पाच वेळा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे आर्मीकडून सांगण्यात आले आहे. नुकतेच युनिट लाईनमध्ये अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली होती. यानंतर चव्हाण आपल्या युनिटमधून फरार होता, असे लष्कराने सांगितले आहे.
धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावाचे मूळ रहिवासी असणारे आणि भारतीय सैन्य दलातील 37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या घटनेच्या चौकशीदरम्यान चंदू यांनी भारतीय लष्करी आस्थापनांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आपण पाकिस्तानविरोधातील संतापातून हे कृत्य केल्याचे सांगितले होते.
सीमावर्ती भागात तैनात एखाद्या युनिटमध्ये असा काही प्रकार घडला तर केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे तर तुकडीतील जबाबदार अधिकाऱ्यांवरही वेगवेगळ्या स्वरूपात कारवाई होते. लष्कर संपूर्ण चौकशीअंती कारवाईचे स्वरूप निश्चित करते. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने चंदू यांना 89 दिवसांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगल्यानंतर त्यांची अहमदनगर येथील लष्करी आस्थापनेत बदली करण्यात आली होती.
मात्र याठिकाणी आल्यापासून सैन्य दलात मला वाईट वागणूक मिळत असून माझ्याकडे वाईट नजरेने बघितले जात आहे. सातत्याने मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे मी अपमानित होत आहे. यामुळे मी सैन्यात नियमित येऊ शकत नसल्याचं सांगत चंदू चव्हाण यांनी डी एम रेजिमेंट श्रीमान कमान अधिकारी यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे.
मी माझ्या समस्या अधिकाऱ्यांना लिखित स्वरुपात दिल्या आहेत. मात्र माझ्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, माझ्या समस्यांचे निराकारण झाले नाही तर मी आमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
चंदू चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे भारतीय सैन्य दलात खळबळ उडाली आहे. चंदू चव्हाण यांच्या राजीनाम्यावर भारतीय सैन्य दलातील अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2019 11:20 AM (IST)
पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यानंतर चंदू चव्हाण यांना भारतात परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या घटनेच्या चौकशीदरम्यान चंदू यांनी भारतीय लष्करी आस्थापनांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन आपण पाकिस्तानविरोधातील संतापातून हे कृत्य केल्याचे सांगितले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -