मात्र यामुळं तातडीने उभारली जाणं आवश्यक असलेली तीन हॉस्पिटल्स उभारण्यास उशीर तर होणार नाही ना?अशी भीती निर्माण झालीय. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढतेय. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळं दरररोज अनेक जणांचे मृत्यू होतायत. मात्र या गंभीर परिस्थितीतही राजकीय पक्ष त्यांचं राजकारण करायचं सोडत नाहीयेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पुणे दौरा, कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेणार
येणारा काळ हा पुण्यासाठी अधिक आव्हानात्मक असेल, हे ओळखून पुण्यात तीन जम्बो हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी आयसीयु बेड आणि ऑक्सिजनची सुविधा करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी पुण्यातील कॉन्सिल हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली.
पुणे महापालिकेची रक्कम देण्यास असमर्थता
या बैठकीत तीन जंबो हॉस्पिटल्ससाठी तीनशे कोटी रुपये खर्च करायचं ठरलं. या तीनशे कोटींपैकी पन्नास टक्के रक्कम राज्य सरकार, पंचवीस टक्के पुणे महापालिका आणि प्रत्येकी साडेबारा टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांनी द्यायची आहे. पण पुणे महापालिकेने ही रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त करत राज्य सरकारनेच सगळा भार उचलावा अशी मागणी केलीय. पुणे महापालिकेने आतपर्यंत कोरोनासाठी सव्वाशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च केला असल्यानं आता महापालिकेकडे पैसे उरले नसल्याचं सत्ताधारी भाजपचं म्हणणं आहे.
हा भाजपचा आडमुठेपणा- राष्ट्रवादी
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी राज्य सरकारने सर्व खर्च करावा अशी विनंती केली आहे. नोव्हेंबरमध्ये पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून कोरोना निवारणाचा जास्तीत जास्त खर्च महापालिकेलाच करावा लागला असून पुढचे अनेक महिने महापालिकेला हा भार उचलावा लागणार असल्याचं हेमंत रासनेंच म्हणणं आहे. मात्र महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हा भाजपचा आडमुठेपणा असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या मुद्द्यावर भाजपला राजकारण न करण्याचं आवाहन केलंय.
पिंपरी चिंचवड महापालिकेची वाटा उचलण्याची तयारी
पुणे महापालिकेने त्यांचा वाटा उचलण्यास नकार दिलेला असताना शेजारच्या पिंपरी चिंचवड महापालिकेने मात्र त्यांचा वाटा उचलण्याची तयारी दाखवलीय. पिंपरी - चिंचवड महापालिकेवर देखील पुण्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. मात्र आमच्या नागरिकांना उपचार मिळणार असतील तर आम्ही खर्च करण्यास तयार आहोत असं पिंपरी - चिंचवडच्या भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी पैसे देण्यास तयारी दाखवताना तीन पैकी एक हॉस्पिटल पिंपरी - चिंचवडच्या हद्दीत असावं अशी मागणी केलीय आहे. त्याचबरोबर या जम्बो हॉस्पिटल्ससाठी लोकसंख्येच्या प्रमाणात पैशांचा वाटा उचलण्यास पिंपरी - चिंचवड महापालिका तयार असल्याचं म्हटलंय.
सुरुवातीपासून दावे-प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप
कोरोनाशी लढण्यासाठी कोणी किती निधी दिला यावर सुरुवातीपासून दावे-प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पण आता उपचारांअभावी दररोज रुग्ण दगावत असताना त्याचं राजकारण होणं पुणेकरांना अजिबात अपेक्षित नाही. सध्याच्या परिस्थितीला कोरोना विरुद्धच युद्ध म्हटलं जात असताना हे युद्ध जिंकण्यासाठी एकी दाखवणंही तेवढंच गरजेचं आहे . आर्थिक परिस्थिती मग ती महापालिकेची असेल, राज्य सरकराची असेल किंवा केंद्र सरकराची असेल बिकट असल्याचं आपण सगळेच जाणतो. अशावेळी आहे त्या निधीचा पुरेपूर उपयोग होणं आणि त्यासाठी राजकारण्यांनी पक्षभेद बाजूला ठेऊन आपसांत समन्वय राखण्याची गरज आहे. लोकांना कोरोनापासून काळजी घेण्याचा सल्ला देणारे राजकारणी तेवढं नक्की करतील ही पुणेकरांना अपेक्षा आहे.