लातूर : संकटे आली तर एकटे येत नसतात. त्यांची मालिका एकदा सुरु झाली की मग अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. या संकटात मग आलेले आनंदाचे क्षण कसे साजरे करावे हेच कळत नाही. काहीसी अशीच वेळ लातूरच्या रेणुकावर आली आहे.


रेणुका दिलीप गुंडरे ही दहावित शिकत आहे. काल तिचा निकाल आला. मात्र निकाल येण्यापूर्वी 20 तास आधी तिच्या आईचे सर्पदंशने निधन झाले होते. रेणुकाला 93.20 टक्के गुण मिळाले आहेत. कौतुक करायला आईच ह्या जगात नाही. वडिलांचे नऊ वर्षापूर्वीच निधन झाले होते. आज घरात तीच सर्वात मोठी आहे. दोन लहान बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली आहे.


रेणुका लातूर जिल्ह्यातील होकर्णा या गावात राहते. आई-वडील मोल मजूरी करत होते. रेणुका घरातील सर्वात मोठी. तिच्या पाठीवर दोन बहिनी. यातच नऊ वर्षापूर्वी वडील आजारपणात गेले.आई अनिता गुंडरे यांनी घरातील सर्वांची काळजी घेत काम करणे सुरुच ठेवले. रेणुकाही आई बरोबर कामाला जात होती. घरात कमावती फक्त आईच होती. यामुळे शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी रेणुकाही आई बरोबर कामाला जात होती. तेवढाच घराला आधार.


SSC Results 2020 | बीडमधील धनंजय नखातेने मिळवले सार्‍याच विषयात 35 गुण!


लहानपणातच स्वत:च्या शिक्षणसाठी लागणारा पैसा स्वत: उभा केला. होकर्णा येथील शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यावर वांजरवाडा येथील शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. रोज होकर्णा ते वांजरवाड़ा पायपीट करत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. रोज शिक्षणाच्या गोडीमुळे चार किलोमीटरची पायपीट रेणुका करत होती. या कष्टाचे चीज झाले होते, मात्र हे यश पाहण्यापूर्वीच तिच्या आईचे निधन झाले. विषारी सापाच्या दंशमुळे तिच्या आईचा मृत्यू झाला आहे.


मुलीचे यश बघायला हक्काचे कोणीही राहिले नाही. निकाल आल्यावर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी नसताना अतिशय प्रतिकूल परस्थितीत रेणुकाने हे यश संपादित केले आहे. आज रेणुकाच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न आहेच. मात्र आता तिच्या दोन लहान बहिणींचे शिक्षण आणि इतर बाबींसाठी होणारा खर्च रेणुकाने कुठून उभा करावा. कारण कामाला गेले नाही तर घर चलत नाही, अशी स्थिती आहे. याची माहिती गावातील लोकांनाही आहे. असल्या अनंत समस्याशी झगड़ा देणाऱ्या या तीन बहिणींना कोण आधार देणार हा मोठा प्रश्न आहे.





संबंधित बातम्या