उस्मानाबाद: उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीतील विजय हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय आहे. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असं म्हणत भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली.


विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर ते एबीपी माझाशी बोलत होते.

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला.

सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.

धस यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का आहे, तर पंकजा मुंडे यांचा मोठा विजय आहे.

सुरेश धस यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

स्मार्टवॉच, किचन, आयफोन वाटूनही राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेला उमेदवार पराभूत झाला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरला. मात्र तरीही काही उपयोग झाला नाही. इथून पुढे राष्ट्रवादीने घड्याळऐवजी किचन, स्मार्टवॉच, आयफोन, कॅमेरा हे चिन्हं घ्यावं, असं सुरेश धस म्हणाले.

घड्याळ घातलेल्या हातांची मदत

या निवडणुकीत कोणाकोणाची मदत झाली, असं विचारलं असता धस म्हणाले, मी भाजपचा उमेदवार आहे. मला सर्वांची मदत झाली. घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने गोरगरिब नगरसेवक, झेडपी सदस्य, पंचायत समिती सभापतींवर नजर ठेवण्याऐवजी तुमच्या पक्षात तोडपाणी कोण करतात, त्यांच्यावर कॅमेरे लावले तर फार बरं होईल, असा टोलाही सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना लगावला.

तसंच मी धनंजय मुंडेंबाबत काही बोलणार नाही. मी कुठेही त्यांचं नाव घेतलं नाही. बाप बाप हौत है बेटा बेटा होता है, असंही सुरेश धस म्हणाले.

तुमची नवरी सांभाळा

काँग्रेसने आघाडीचा धर्मा पाळला नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, पण राष्ट्रवादीला काँग्रेसबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे?

तुमची नवरी मंडपातून पळून गेली, तुम्ही दुसरी आणली, पण ती नवरी आणताना तरी कोणाला विचारलं होतं का हे मला माहित नाही, असं टोमणा धस यांनी लगावला.

राष्ट्रवादीने भाजपमधून आलेले रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला होता.

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक अंतिम निकाल

527 सुरेश धस

451 अशोक जगदाळे

25 बाद

एकूण फरक 76

सुरेश धस विजयी घोषित

VIDEO:


संबंधित बातम्या

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद : सुरेश धस विजयी

विधानपरिषद: संख्याबळ नसूनही सुरेश धस कसे जिंकले?