उस्मानाबाद: उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला आहे.


सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.

धस यांचा विजय हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का आहे, तर पंकजा मुंडे यांचा मोठा विजय आहे.

राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला होता.

त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार कोण यापेक्षा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत असल्याचं चित्र होतं.

संख्याबळ नसूनही सुरेश धस जिंकले

उस्मानाबाद-लातूर-बीड या तीन जिल्ह्यात मिळून एकूण 1006 मतदार होते. त्यापैकी 1005 जणांचं मतदान झालं. एक मत बाद झालं.

1006 मतांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, 94 अपक्ष, शिवसेनेचे 64 आणि भाजपचे 321 मतदार होते. त्यामुळे जवळपास 100 मतं कमी असलेली भाजपा मतांचं गणित कसं जुळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

एकूण 1006 मतदार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस- 527 (राष्ट्रवादी 336+ काँग्रेस 191)
शिवसेना - 64
भाजप - 321
अपक्ष – 94

सुरेश धस यांनी करुन दाखवलं

सुरेश धस यांनी जवळपास 100 मतं कमी असूनही तब्बल 74 मतांनी विजय मिळवला. निवडणुकीपूर्वी भाजप आणि मित्रपक्षांचं संख्याबळ जवळपास 400 होतं. मात्र 100 पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर असूनही, सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवारापेक्षा तब्बल 74 मतं जास्त मिळवली.

राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्याकडे 527 मतांचं बळ असूनही त्यांना 452 मतं मिळाली. तर विजयी सुरेश धस यांच्याकडे 385 इतकीच मतं असताना, त्यांनी 526 एवढी मतं मिळवत, विजय संपादित केला.

सुरेश धस हे पूर्वीपासूनच आपला विजय होणार हे ठासून सांगत होते. मात्र ते आकडे कसे जुळवणार हाच प्रश्न होता. पण त्या प्रश्नाचं उत्तर धस यांनी विजय मिळवून दिलं आहे.

धस यांच्या या विजयावरुन त्यांनी आपली मतं तर मिळवलीतच, शिवाय विरोधीपक्षांचीही मतं मिळवत, त्यांनी धनंजय मुंडेंन जोरका झटका दिला.

उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक अंतिम निकाल

527 सुरेश धस

451 अशोक जगदाळे

25 बाद

एकूण फरक 76

सुरेश धस विजयी घोषित

संबंधित बातम्या 

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद : सुरेश धस विजयी