मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींनी आरोप फेटाळले. भिवंडी कोर्टात आज सुनावणी पार पडली.

आपल्यावरील आरोप मान्य नाहीत, असे राहुल गांधींनी कोर्टात सांगितले. मात्र राहुल गांधींवर दोषारोपपत्र ठेवून खटला चालवला जाणार आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.

अवमान याचिकेवरील सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर होते.

प्रकरण काय आहे?

महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

आज कोर्टात काय झालं?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कोर्टात उपस्थित राहिल्यानंतर कार्यवाहीला सुरुवात झाली. यावेळी राहुल गांधींनी आपल्यावरील आरोप फेटाळले आणि खटल्यासाठी तयार आहे, असे त्यांनी कोर्टाला सांगितले. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर दोषारोपपत्र ठेवून खटला पुढे चालवला जाईल.

या खटल्यावर येत्या 10 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

विचारधारेसाठी लढाई – राहुल गांधी

असे खटले होत राहतील. मात्र माझी लढाई विचारधारेसाठी सुरु आहे आणि ती नक्की जिंकू, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

याचिकाकर्ते कुंटे नाराज

राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विशेष वागणूक दिली गेली. मी याचिकाकर्ता असूनही मला कोर्ट रुममध्ये प्रवेश दिला गेला नाही, मात्र राहुल गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते आत गेले होते. पोलिस एकांगी भूमिकेत दिसत होते, असे म्हणत याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी नाराजी व्यक्त केली.

LIVE UPDATS :

- भिवंडी कोर्टातील राहुल गांधींशी संबंधित सुनावणी संपली, पुढील सुनावणी 10 ऑगस्टला

- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात आरोप निश्चित, भिवंडी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल 

- भिवंडी न्यायालयात राहुल गांधी उपस्थित, न्यायालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा



- महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, भाई जगताप, जनार्दन चांदुरकर, राजू वाघमारे यांच्यासह मुंबतील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींचे स्वागत केले

- राहुल गांधी मुंबईत दाखल



कसा असेल राहुल गांधींचा मुंबई दौरा?

भिवंडी कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतील. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी याबाबत माहिती दिली.

दुपारी सव्वा तीन वाजता राहुल गांधींची गोरेगावमध्ये सभा होईल.

काँग्रेसकडून ऑफलाईन आणि ऑनलाईन कॅम्पेन सुरु करण्यात येत आहे, ज्याचं नाव प्रोजेक्ट शक्ती असं आहे. याचं अनावरण राहुल गांधी करतील आणि एक व्हिडीओ रिलीज करतील.

प्रत्येक बूथ कार्यकर्ता त्यांचं व्होटर आयडी राहुल गांधी यांना पाठवतील

तीन प्रकारचं साहित्य कार्यकर्त्यांना दिलं जाणार आहे.

फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या असणाऱ्या गोष्टी पुस्तकाच्या रुपात दिल्या जाणार आहेत. यात पंकजा मुंडे, गिरीश बापट, रवींद्र वायकर, एकनाथ खडसे, विष्णू सावरा, दीपक सावंत, विनोद तावडे, तसेच चहा घोटाळा, उंदीर घोटाळा, समृद्धी घोटाळा याचा या पुस्तकात समावेश असेल.

मोदी सरकार चार वर्षात कसं अपयशी ठरलं हे पुस्तक कार्यकर्त्यांना दिलं जाणार आहे, ज्याचं नाव विश्वासघात असं आहे.

तिसरं डॉक्युमेंट मुंबई महापालिकेवर असेल, जे चार पानांचं आहे. रस्ते, नालेसफाई, शिक्षण, आरोग्य या विषयांचा त्यात समावेश आहे.